वृत्तसंस्था, पेशावर :पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये रविवारी सकाळी दोन शीख व्यावसायिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या या अशांत प्रांतातील अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना लक्ष्य करून करण्यात आलेली ही ताजी हत्या आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानशी शत्रुत्व असलेल्या दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी व्यक्त केला आहे.

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केलेल्या हल्ल्यात सलजित सिंग (४२) आणि रणजित सिंग (३८) यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही मसाल्यांचा व्यवसाय करत होते आणि पेशावरपासून १७ किमी अंतरावर असलेल्या सरबंदच्या बाता ताल बाजारात त्यांची दुकाने होती. या हत्येची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाने याप्रकरणी हत्येच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

केतकी चितळेने पवारांविषयी लिहलेली फेसबुक पोस्ट घाणेरडी आणि चुकीची: सुजात आंबेडकर

पेशावरमध्ये सुमारे १५ हजार शीख राहतात. त्यातील बहुतेक जोगन शाह येथे वास्तव्यास असून विविध व्यवसायांत गुंतलेले आहेत. काही जणांची औषधांची दुकाने आहेत. देशातील अल्पसंख्याक शीख नागरिकांवर याआधीही अनेकदा जीवघेणे हल्ले झाले आहेत.

दोषींना शिक्षा देण्याची भारताची मागणी

खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये करण्यात आलेल्या दोन शीख व्यावसायिकांच्या निर्घृण हत्येचा पाकिस्तानने प्रामाणिकपणे तपास करावा आणि दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी भारताने रविवारी केली. अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याबद्दल भारताने पाकिस्तानकडे तीव्र निषेध नोंदवला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बाघची यांनी सांगितले.

अमरिंदर यांच्याकडून निषेध

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या दोन शीखांच्या हत्येचा निषेध केला. शेजारील देशाचे सरकार शीख समुदायाच्या लोकांना खोटी आश्वासने देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘मी भारताच्या पंतप्रधान कार्यालयाला ही बाब गांभीर्याने घेण्याची विनंती करतो’, असे ट्वीट अमरिंदर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here