सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी फेसबुकवर एक पोस्ट लिहिल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे वादात सापडली आहे. आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याने केतकीवर टीकेची झोडही उठवण्यात आली आहे. मात्र रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेचं समर्थन करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
‘केतकी चितळे ही कणखर आहे, तिला कोणाच्या समर्थनाची गरज नाही. तिने न्यायालयात वकील न देता स्वत:च स्वत:ची बाजू मांडली, त्यामुळे तिला मानावं लागेल. तिने शरद पवार यांच्यावर पोस्ट केल्यानंतर त्या पोस्टखाली तुमच्या कार्यकर्त्यांनी काय कमेंट केल्या आहेत, ते एकदा बघा. म्हणजे तुम्ही केलं की पाटलाच्या पोराने केलं आणि दुसऱ्याने केलं की कुणब्याच्या पोराने केलं, हे धंदे बंद करा,’ असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘तुम्हीच बहिरे आहात, मला कशाला बोलता…’, खैरेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तुमच्या नैतिकता कुठे गेली होती? आताच नैतिकता का उफाळून येत आहे? असा सवालही खोत यांनी विचारला आहे. तसंच आम्हाला प्रस्थापितांचा वाडा पाडायचा आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केतकी चितळेवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केलं असता तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.