पुणे : पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला पुण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना राष्ट्रवादीच्या विरोधाला सामोरे जावे लागले. स्मृती इराणींच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी हॉटेलबाहेर महागाई विरोधात आंदोलन केले. काही कार्यकर्ते तर हाॅटेलमध्ये शिरले. मात्र, पुणे पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच, देशातील वाढती महागाई, घरगुती गॅसचे वाढलेले दर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना केंद्र सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या देखील मंत्री इराणी यांना चूल व बांगड्या भेट देण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचल्या.
दरम्यान, देशातील महागाईच्या विरोधात लढताना व जनतेचे प्रश्नांवर काम करतांना पोलिसांनी अशा प्रकारे ताब्यात घेणे निषेधार्ह आहे. जनतेच्या प्रश्नांवर पोलिसांनी अशाप्रकारे शंभरवेळा जरी अटक केले तरी आम्ही तयार आहोत. असं यावेळी पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा आनंद म्हणाल्या.