एक ते दीड हजार फोटो
आज ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा तिसरा दिवस होता. सर्वेक्षण करण्यासाठी टीम मशिदीत पोहोचली, मात्र, सदस्य आरपी सिंह यांना बाहेर थांबवण्यात आलं. सर्वेक्षणातील बाबी लीक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. तिसऱ्या दिवसाच्या सर्वेक्षणात त्यांना सहभागी करुन घेण्यात आलं नाही. आज ज्ञानवापी मशिदीच्या परिसरातील १ ते दीड हजार फोटो काढण्यात आले. हे फोटो आयुक्तांना देण्यात येणार आहेत. सर्वेक्षण अहवाल आयुक्तांना सोपवण्यात येणार आहे.
मशिदीत शिवलिंग मिळाल्याचा दावा
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवशी हिंदू पक्षाच्यावतीनं मशिदीत १२ फुट ८ इंचाचं शिवलिंग मिळाल्याचा दावा केला. सोहन लाल यांनी माध्यमांशी बोलताना बाबा मिळाल्याचं म्हटलं आहे. नंदीच्या समोर शिवलिंग मिळालं असून भिंतीवर आणि फरशीवर काही पुरावे आढळल्याचा दावा सोहन लाल यांनी केला.
कोर्टात धाव
हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी मशिदीत शिवलिंग मिळाल्याचा दावा केला. आम्ही शिवलिंगाच्या संरक्षणासाठी न्यायालयात जात असल्याचं ते म्हणाले.
ती जागा सील करण्याचे आदेश
दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश रवि दिवाकर यांच्यापुढं विष्णू जैन यांचे वडील हरिशकर जैन यांच्या नावे याचिका दाखल करण्यात आली. मशिदीतील परिसरात शिवलिंग मिळाल्याचा दावा करण्यात आला. ती जागा सील करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय त्या ठिकाणी मुस्लीम व्यक्तींना प्रवेश देऊ नये आणि नमाज पठण करण्यासाठी केवळ २० जणांना परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोर्टानं मागणी स्वीकारली
न्यायालयानं जैन यांचा अर्ज स्वीकारत जिल्हा प्रशासनाला संबंधित जागा सील करण्याच्या आदेश दिले आहेत. पोलीस, दंडाधिकारी आणि सीआरपीएफला सील करण्यात आलेल्या जागेचं संरक्षण करण्याच जबाबादरी देण्यात आली आहे. न्यायालयानं त्या जागेचं संरक्षण आणि इतर व्यवस्थेची जबाबदारी उत्तर प्रदेशचे डीजीपी आणि मुख्य सचिवांना दिली आहे.
मुस्लीम पक्षानं दावा नाकारला
मुस्लीम पक्षानं हिंदू पक्षाचा दावा नाकारला आहे. मशिदीत शिवलिंगासारखं काही आढळलेलं नाही. मुस्लीम पक्षाचे वकील अभयनाथ यादव यांनी तो भाग तिथ असलेल्या कारंजाचा आहे, असा दावा केला.
उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी
शिवलिंग असल्याचा दावा करण्यात आलेल्या जागेला सील करण्याच्या दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाला मुस्लीम पक्षाकडून अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्याबाबत तयारी करण्यात येतेय.
ज्ञानवापी वरुन राजकारण
ज्ञानवापी मशिदीवरुन सोमवारी देखील राजकारण सुरु होतं. केशव प्रसाद मौर्य यांनी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बाबा महादेव यांचं शिवलिंग सापडणं देशातील सनातन हिंदू परंपरेला पौराणिक संदेश असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे एमआयएचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ज्ञानवापी मशीद होती आणि ती मशीदचं राहिल असं म्हटलं आहे. आम्ही बाबरी गमावली आहे, आता आणखी एक मशीद गमावणार नसल्याचं म्हटलं आहे.
मेहबुबा मुफ्ती यांची प्रतिक्रिया
पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी बाबरी प्रकरणी काही सिद्ध झालं नाही. आता हे लोक ज्ञानवापी मशिदीच्या मागे लागले आहेत. मेहबुबा मुफ्ती यांनी त्यांना मशिदीतच भगवान आढळतो, असं म्हटलंय.
वाराणसी घाटावर विशेष आरती
हिंदू पक्षाच्या लोकांनी ज्ञानवापीमध्ये कथित शिवलिंग मिळाल्याचा दावा केल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. वाराणसीच्या घाटावर त्यांनी विशेष आरती केली.