मुंबई: गल्लीपासून दिल्लीपर्यंत हनुमान चालीसेवरुन रान उठवणारे नवनीत राणा आणि रवी राणा हे दाम्पत्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. राणा दाम्पत्याने महाराष्ट्रावरील संकट दूर करण्यासाठी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा संकल्प केला होता. मात्र, शिवसैनिकांच्या विरोधामुळे त्यांची इच्छा फलद्रूप झाली नव्हती. एवढेच नव्हे याप्रकरणात राणा दाम्पत्याला १४ दिवस तुरुंगातही राहावे लागले होते. मात्र, तुरुंगातून बाहेर पडल्यानंतरही राणा दाम्पत्याने हनुमान चालीसेचा मुद्दा लावून धरत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणे सुरु ठेवले आहे. हनुमानासाठी आपण १४ दिवस काय, १४ वर्षे तुरुंगात जाऊ, अशी गर्जनाही नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केली होती. महाराष्ट्रात शिवसेनेच्या विरोधामुळे डाळ शिजत नसल्याने राणा दाम्पत्याने दिल्लीत जाऊन हनुमान चालीसा पठण केले होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राणा दाम्पत्याने आम्हाला महाराष्ट्रात कशाप्रकारे हनुमान चालीसा म्हणून दिली जात नाही, हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. (Navneet Rana and Ravi Rana did’t know about Hanuman history)
Navneet Rana: उद्धव ठाकरेंची सत्ता गेल्यावर रश्मी ठाकरे जेलमध्ये जातील; नवनीत राणांचं सूचक वक्तव्य
मात्र, याच राणा दाम्पत्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हनुमानाविषयी मनात अपार श्रद्धा आणि भक्तिभाव असल्यामुळेच राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठणासाठी इतके आग्रही होते, असे चित्र आतापर्यंत तरी दिसत होते. मात्र, एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलेल्या एका साध्या प्रश्नावर नवनीत राणा आणि रवी राणा यांची चांगलीच पंचाईत होताना दिसली. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत कार्यक्रमाची सूत्रसंचालिका नवनीत राणा यांना एक प्रश्न विचारला. तुम्ही हनुमानाची इतकी भक्ती करता. मग मला एक सांगा की, हनुमानाचं नाव हनुमान कसं पडलं? हा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर नवनीत राणा बुचकाळ्यात पडल्या. एरवी त्यांना कायम प्रॉम्प्टिंग करणाऱ्या रवी राणा (Ravi Rana) यांच्याकडेही त्यांनी पाहिले. मात्र, कदाचित त्यांनाही या प्रश्नाचे उत्तर माहिती नसावे. या सगळ्यामुळे राणा दाम्पत्याची चांगलीच अडचण झाली.

यावर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिकेने पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. हनुमानाचं नाव पहिले हनुमान नव्हतं, ते कसं पडलं, असे नवनीत राणा यांना विचारण्यात आले. त्यावर नवनीत राणा यांनी म्हटले की, तुम्ही आता इतिहासात नेत असाल तर आम्ही हनुमानाविषयी माहिती घेऊ. या सगळ्याचा इतिहास पुन्हा वाचू. मी हनुमान चालीसा वाचते, त्याविषयी मी नक्की बोलू शकेन, असे उत्तर नवनीत राणा यांनी दिले. मात्र, एकूणच परिस्थिती पाहता या प्रश्नावर राणा दाम्पत्य क्लीन बोल्ड होताना दिसले. त्यामुळे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here