यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यात झालेल्या राड्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरले. गृहमंत्री आपलाच आहे या भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दररोज कायदा हातात घेत आहेत. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते अशाप्रकारचं कृत्य करू लागलेत यावरून महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था उरलेली नाही, हे स्पष्ट दिसत आहे. स्मृती इराणी यांच्यावर झालेला हल्ला भ्याड होता. आम्ही या हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर देऊ शकलो असतो. पण आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत. आम्ही पोलिसांना कारवाईची संधी देत आहोत. पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली नाही तर आम्हालाही जशास तसं उत्तर द्यावे लागेल, हे मी आत्ताच सांगत आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल.
भाजपकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण
बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. यामध्ये भाजपचा एक कार्यकर्ता महिलेला फटका मारताना दिसत आहे. मात्र, त्यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्याने भाजपच्या कार्यकर्त्याला कानशिलात लगावत मागे रेटले.राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केलाय. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांना फोन करुन संबंधित प्रकरणाची माहिती घेतली तसेच कार्यकर्त्यांची विचारपूस केली.