monsoon: कोकण किनारपट्टीवर मान्सूनची चाहूल, समुद्राच्या लाटांमधून फेस यायला सुरुवात – monsoon rain will showers in konkan by 2 june weather changes in konkan sea
मुंबई: नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून सोमवारी अंदमानात दाखल झाल्यानंतर आता महाराष्ट्रात पावसाचे आगमन कधी होणार, याचे वेध सर्वांना लागले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार तळकोकणाल २ जूनपर्यंत मान्सूनचे (Monsoon) आगमन होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर तसे संकेतही मिळण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरीच्या समुद्रात सध्या लाटांसोबत सध्या फेस मोठ्याप्रमाणावर वाहून येत आहे. पावसाचे आगमन होण्यापूर्वी लाटांना अशाप्रकारे फेस यायला (फेणी) सुरुवात होते, असे स्थानिक मच्छिमारांचे म्हणणे आहे. याशिवाय, समुद्रात दक्षिण दिशेला वारे वाहायला लागले आहेत. या सगळ्या गोष्टी मान्सूनच्या आगमनाचे संकेत मानले जातात. त्यामुळे लवकरच मान्सून कोकणात दाखल होण्याची चिन्हे दिसत आहेत. तर दुसरीकडे विदर्भातही यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत १७ ते १९ मे या कालावधीत विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या १३ जिल्ह्यांना यलो इशारा देण्यात आला आहे. आनंदाची बातमी! यंदा मान्सून १० दिवस लवकर; कोकण-मुंबईत कधी दाखल होणार?
मुंबईसाठी पावसाळ्यात २२ दिवस धोक्याचे
यंदा जून ते सप्टेंबर महिन्यात २२ दिवस असे असणार आहेत, ज्यावेळी समुद्राला मोठी भरती येईल. त्यामुळे यादरम्यान जर मुसळधार पाऊस झाला तर मुंबई तुंबणार अशी माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी हे २२ दिवस धोक्याचे असणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जून, जुलै महिन्यात प्रत्येकी सहा दिवस आणि ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी पाच दिवस समुद्राला मोठी भरती येईल. हे दिवस मुंबईकरांसाठी कठीण असणार आहेत.