राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा संकल्प केला होता. मात्र, शिवसैनिकांच्या विरोधामुळे राणा दाम्पत्याला मातोश्रीपर्यंत पोहोचणे शक्य झाले नव्हते. यावेळी संजय राऊत यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर सडकून टीका केली होती. राऊत यांनी या दोघांचा उल्लेख ‘बंटी-बबली’ असा केला होता. त्यामुळे संतापलेल्या नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. या सगळ्या नाट्यात राणा दाम्पत्याला १४ दिवस तुरुंगातही राहावे लागले होते. ठाकरे सरकारने राणा दाम्पत्यावर राजद्रोहाच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतरही नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याकडून शिवसेनेवर टीका करणे सुरुच आहे. त्यामुळे संसदीय समितीच्या अभ्यास दौऱ्यात संजय राऊत आणि राणा दाम्पत्य समोरासमोर आल्यानंतर काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
नादाला लागाल तर २० फूट खाली गाडू : संजय राऊत
राज्यात सत्ता असल्याने शिवसैनिकांचा माज पोलिसांच्या जीवावर आहे, असा आरोप राणा दाम्पत्याने केला होता. त्यांच्या याच आरोपाला संजय राऊतांनी खास सेना स्टाईलमध्ये उत्तर दिले होते. “आम्ही शिवसैनिक जन्मत: माजोरडे आहोत, आमच्या नादाला लागले तर २० फूट खाली गाडू. जर तुमची आमच्या नादाला लागण्याची इच्छाच असेल तर मग तुमच्या गोवऱ्या अगोदर स्मशानात नेऊन ठेवा आणि मग मैदानात या”, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर राणा दाम्पत्याने आक्षेप घेतला होता. या वक्तव्यासाठी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी राणा दाम्पत्याने केली होती.