‘गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे,’ असं म्हणत रोहित पवार यांनी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीबाबत संताप व्यक्त केला आहे.
चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून रोहित पवार यांनी राज्य पातळीवरील भाजप नेत्यांनाही लक्ष्य केलं आहे. ‘चंद्रकांत दादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल अशी अपेक्षा होती. पण आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारं आहे,’ असं रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवला आहे, आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये आणि या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.