मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्यापूर्वी पुण्यात सभा घेणार आहेत. या सभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुणे पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. मात्र, पोलीस या सभेसाठी परवानगी देणार की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेची तारीखही निश्चित झाली नव्हती. याविषयी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांना विचारणा करण्यात आली. राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला परवानगी देणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर गृहमंत्र्यांनी म्हटले की, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारण्याचे कारण दिसत नाही. पोलीस आयुक्त या सभेला परवानगी देतील. मात्र, मनसेने पोलीस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे वळसे-पाटील यांनी सांगितले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी सोमवारी पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या राड्यासंदर्भातही भाष्य केले. यासंदर्भात पोलीस योग्य ती कारवाई करतील. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चूक केली असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. भाजपच्या कार्यकर्त्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई होतील. भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करणे ही आक्षेपार्ह बाब आहे. यासंदर्भात पुणे पोलीस योग्य ती कारवाई करतील, असे दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
‘भोंग्यांच्या मुद्द्याचा मनसेला फायदा होईल, प्रत्येक महानगरपालिकेत ४-५ नगरसेवक निवडून येतील’
अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ही सभा होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) पुणे पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. ही परवानगी मिळाल्यानंतर राज यांच्या सभेची तारीख निश्चित होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, २१ मे किंवा २९ मे रोजी राज ठाकरे यांची सभा होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे हे आजपासून पुण्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. काहीवेळापूर्वीच ते ‘शिवतीर्थ’हून पुण्याच्या दिशेने रवाना झाले होते.
‘ज्यांना घरातून बाहेर काढलं, त्यांच्यावर काय बोलू? त्यांची लायकी नाही’ ओवेसींची राज ठाकरेंवर टीका

राज ठाकरे वसंत मोरेंशी चर्चा करणार

गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरु असल्याचे दिसत आहे. मनसेच्या कोअर कमिटीमधील काही नेत्यांकडून माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना सातत्याने डावलले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. वसंत मोरे यांनी या सगळ्याची तक्रार वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज किंवा उद्या वसंत मोरे यांच्याशी चर्चा करतील, असे सांगितले जात आहे. यानंतर राज ठाकरे पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना काय सूचना देतात, हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here