एपीएमसी व्यवस्थापनाने माथाडी कामगार, व्यापारी तसेच वाहतूकदारांच्या प्रतिनिधींशी केलेली चर्चा यशस्वी ठरली असून कांदा-बटाटा तसेच भाजी मार्केटमधील सर्व व्यवहार १५ एप्रिलापासून पूर्ववत करण्यास सर्वांनीच तयारी दर्शविली आहे.
करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तसेच मार्केट यार्डमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने शनिवारपासून बंद करण्यात आले होते. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागातील भाजीपाला तसेच कांदा बटाटा याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती होती. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवस्थापनाकडून सातत्याने सर्व संबंधितांशी चर्चा सुरू होती. ही चर्चा यशस्वी ठरली आहे. पुरवठ्यावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून भाजीपाला मार्केट पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या अनुशंगाने नियमावलीलाही अंतिम रूप देण्यात येत आहे, असे एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, एपीएमसीतील व्यापारी आणि कामगारांनी बंदची घोषणा केली त्याच दिवशी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही भाजी मंडई, फळबाजार बंद करण्याचे आदेश जारी केले होते. शुक्रवारी मध्यरात्रीपासून हा बंदीआदेश लागू करण्यात आला. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतील सर्वच महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या हद्दीत सध्या भाजी मंडई बंद आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांची मोठी कोंडी होत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times