काहीवेळापूर्वीच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर गृहमंत्र्यांनी म्हटले की, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारण्याचे कारण दिसत नाही. पोलीस आयुक्त या सभेला परवानगी देतील. मात्र, मनसेने पोलीस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे वळसे-पाटील यांनी सांगितले होते. त्यानंतर काही क्षणांतच मनसेच्या गोटातून सभेला परवानगी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे २१ मे रोजी होणाऱ्या सभेत काय बोलणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
डेक्कन जिमखान्याच्या परिसरातील मुठा नदीपात्रात मनसेची ही सभा होणार आहे. याठिकाणी यापूर्वीही मनसेच्या सभा झाल्या आहेत. याठिकाणी सभा घेतल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही. आम्ही याबाबत संबंधित यंत्रणांचे नाहरकत पत्र आपल्याला देऊच. तरी आपण सदर ठिकाणी स्टेज , बॅरिकेट आणि विद्युत व्यवस्थेसाठी मनोरे उभारण्याची परवानगी द्यावी. तसेच स्पीकरच्या वापरासाठीही परवानगी द्यावी, असे मनसेने डेक्कन जिमखाना पोलिसांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले होते. या सभेची परवानगी जवळपास निश्चित असली तरी पोलीस कोणते निर्बंध घालणार का, हे पाहावे लागेल.