औरंगाबाद शहरात गेल्या महिन्याभरापासून पेट्रोलचा पुरवठा कमी होत असल्याच्या तक्रारी येत आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सोमवारच्या अंकात या समस्यांबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या अनुषंगाने औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिऐशनचे सचिव अखिल अब्बास, हितेन पटेल, झक्झीयस प्रिंटर यांच्यासह अन्य डिलरनी या समस्येबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देऊन, याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अखिल अब्बास यांनी सांगितले, की ‘गेल्या महिनाभरापासून औरंगाबाद शहरातील पंप चालकांना नियमित पुरवठा केला जात नाही. मागणीनुसार ऑईल कंपन्यांकडून वितरण होत नाही. यामुळे शहरातील अनेक पंपाचा पेट्रोलसाठा संपत आहे. त्यामुळे पंप बंद ठेवण्याची वेळ औरंगाबाद शहरातील पंपचालकांवर आली आहे. औरंगाबाद महानगर पालिका क्षेत्रात ५५ पेट्रोल पंप आहेत. यामधून अनेक पंप दररोज बंद राहत आहेत.’
कंपनीच्या प्रतिनिधींकडून महिन्याच्या अखेरीस पेट्रोल पुरवठा कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. यामुळे शहरवासीयांना पेट्रोल टंचाईचा सामना करावा लागण्याचीही शक्यता पंप चालकांनी दिली आहे.
अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा
असोसिएशनकडून देण्यात आलेल्या निवेदनातून पंपचालकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना ऑइल कंपन्याच्या अधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन, शहरासाठी पुरवठा चांगला राहावा. यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. शिवाय जर पुरवठा कमी होत असेल, तर पेट्रोल पंपाच्या वेळा ठरविण्यात याव्यात किंवा कोणत्या भागात पेट्रोल पंप सुरू ठेवावेत किंवा बंद ठेवावेत याचे नियोजन करण्याची मागणी केली आहे.