मुंबई: शिवसेनेचे दिवंगत लोकनेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची सध्या जोरदार हवा आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांतच या ‘धर्मवीर’ने जवळपास नऊ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही चित्रपटगृहात जाऊन ‘धर्मवीर’ चित्रपट (Dharmveer Movie) पाहिला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी या चित्रपटातील शेवट पाहणे टाळले. मिलिंद नार्वेकर यांच्या घरगुती गणपतीचे दर्शन घेऊन आनंद दिघे ठाण्यात परततात. चित्रपटातील हा प्रसंग संपताच उद्धव ठाकरे हे थिएटरमधून बाहेर पडले होते. शेवटच्या प्रसंगात आनंद दिघे यांच्या मृत्यूचा प्रसंग असल्याने आपण शेवट पाहणे टाळले, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती.
एकनाथ शिंदेंच्या मार्केटिंगसाठी’धर्मवीर’ची निर्मिती ? ‘ती’ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
मात्र, शिवसेनेचे हाडवैरी असलेल्या भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एक वेगळाच दावा केला आहे. ‘धर्मवीर’च्या शेवटच्या प्रसंगात राज ठाकरे (Raj Thackeray) आणि नारायण राणे हे आनंद दिघे यांना रुग्णालयात भेटायला गेल्याचे दाखवण्यात आले आहे. उद्धव ठाकरे स्वत:च्या डोळ्यांनी राज आणि नारायण राणेंचं (Narayan Rane) उदात्तीकरण होताना पाहू शकले नसते. तसेच शिवसेनेच्या उभारणीत आपला कोणताही सहभाग नाही, हेदेखील त्यांना पाहावे लागले असते. त्यामुळेच उद्धव ठाकरे या चित्रपटाचा शेवट न पाहता चित्रपटगृहातून बाहेर पडले, असा दावा नितेश राणे यांनी केला.

शेवटच्या सीनमध्ये नेमकं काय?

‘धर्मवीर’च्या शेवटच्या सीनमध्ये आनंद दिघे यांच्या जीपला झालेल्या अपघाताचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. त्यावेळी राज ठाकरे आणि नारायण राणे हे आनंद दिघे यांची विचारपूस करण्यासाठी सिंघानिया रुग्णालयात गेले होते. हे सर्व प्रसंग शिवसैनिकांसाठी अंगावर काटा आणणारे आहेत. शेवटच्या सीनमध्ये आनंद दिघे आणि राज यांच्यातील रुग्णालयातील संवाद दाखवण्यात आला आहे. ‘धर्मवीर हिंदुत्वाचं काम अजूनही सर्वदूर पोहोचलं नाहीए, असं पडून राहून कसं चालेल’, असं तत्कालीन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिघेंना म्हणताना दिसत आहेत. यावर ‘हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर’ असे दिघे राज यांना म्हणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here