यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना पाठिंबा जाहीर केला होता. परंतु, शिवसेनेने सहाव्या जागेवर स्वत:चा उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी पाठिंबा हवा असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी अट घालण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात घडामोडींना प्रचंड वेग आहे. संजय राऊत यांचे ट्विट पाहता त्यांना आपण जिंकू, याबद्दल प्रचंड आत्मविश्वास दिसत आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार, अशी अटकळ बांधली जात आहे.
या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ट्विट करून राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरु करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार! हे दुष्टचक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महाविकास आघाडीकडे आहे. लढेंगे. जितेंगे, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
संभाजीराजे छत्रपतींचं महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदारांना पत्र
राज्यातील विधानसभा आमदारांना संभाजीराजे छत्रपती यांनी खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, असं आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना आणि अपक्ष आमदारांना केले आहे. माझी कारकीर्द व प्रामाणिक कार्यपद्धती पाहता, आपण सर्वजण राज्यसभेच्या या सहाव्या जागेसाठी मला निश्चितच सहकार्य कराल, अशी जाहीर अपेक्षा सदर पत्रान्वये मी व्यक्त करतो, असे संभाजीराजे यांनी पत्रात म्हटले आहे.