राज्यसभेच्या सहा जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. यातील पाच जागांपैकी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे प्रत्येकी एक तर भाजपकडे दोन जागांवर निवडून येण्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी चुरस असून ही जागा आपण लढवणार असल्याचं संभाजीराजेंनी जाहीर केलं होतं. मात्र भाजपकडून ही जागा लढवण्याची तयारी सुरू असल्याने आपणही मैदानात उतरणार असल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे.
संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करणार?
शिवसेना नेते अनिल परब आणि संजय राऊत यांनी राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवणार असल्याचं सांगत आम्ही विजय मिळवू, असा विश्वासही व्यक्त केला आहे. मात्र शिवसेनेनं आपल्या उमेदवाराचं नाव जाहीर केलेलं नाही. शिवसेनेनं ही जागा लढवण्याची भूमिका कायम ठेवली तर संभाजीराजे छत्रपती यांच्या विजयाचं गणित बिघडू शकतं. त्यामुळे त्यांना या जागेवरून निवडून यायचं असल्यास शिवसेनेत प्रवेश करावा लागेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही, अशी घोषणा संभाजीराजेंनी केलेली असल्याने त्यांची आता चांगलीच अडचण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
संभाजीराजेंचं अखेर ठरलं; राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार