मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला वाद आता थेट न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. संजय राऊत यांनी मेधा सोमय्या आणि युवक प्रतिष्ठानवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आज मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यावेळी किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.

‘संजय यांच्याविरोधात आज अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. शिवडी कोर्टाने आमचा हा दावा दाखल करून घेतला आहे. यावर पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी संजय राऊत यांच्याविरोधात ही याचिका आहे. शिक्षा त्यांच्या भोंग्याला होणार, मात्र हा इशारा उद्धव ठाकरे यांना आहे,’ असा हल्लाबोल किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी; मध्य प्रदेश सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

संजय राऊत यांनी आम्हाला घाबरवण्यासाठी घोटाळ्याचा आरोप केला होता. मात्र आमचा एकही रुपयाचा घोटाळा यांना सापडला नाही. २०१६ सालीही उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’च्या माध्यमातून आमच्यावर ११२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा निराधार आरोप केला होता, असं सोमय्या म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणी २६ मे रोजी होणाऱ्या सुनावणीदरम्यान कोर्ट काय सूचना देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here