रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गारून धावणारी व सध्या बंद अवस्थेत असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा पूर्वी प्रमाणेच दादरहून सोडण्यात यावी तसेच संगमेश्वर, चिपळूण व खेडसाठी राखीव अनारक्षित डबे पूर्ववत करावेत, अशी मागणी मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये राहणार्‍या कोकणवासीय प्रवासी जनतेकडून करण्यात आली आहे. यासाठी रेल्वेविषयक अभ्यासक अक्षय महापदी यांनी एक निवेदन रेल्वे प्रशासनाला दिले आहे. दिवा रत्नागिरी एक्स्प्रेस पकडण्यासाठी सध्या प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे.

पूर्वीची गाडी क्र. ५०१०४/५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजरची आता रत्नागिरी दिवा पॅसेंजर झाली आहे. कोव्हिडपूर्व काळात रत्नागिरी दादर पॅसेंजरला दोन आरक्षित डबे होते तसेच संगमेश्वर, चिपळूण व खेड येथे प्रत्येकी एक अनारक्षित डबा उघडत असे. रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांतून मुंबईकडे जाणार्‍या गाड्यांमध्ये चढणे हे अद्यापही एक मोठे दिव्यच आहे. गाड्या संबंधित स्थानकात पोहोचण्याआधीच गर्दीने ओसंडून वाहत असल्यामुळे आरक्षण असूनही एखाद्याला आपली आरक्षित जागा मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे, येथील प्रवाशांना त्या त्या स्थानकात उघडणार्‍या अनारक्षित डब्यांचा मोठा आधार होता. परंतु आता आरक्षणही नाही आणि हक्काचे अनारक्षित डबेही नाहीत अशी येथील प्रवाशांची व्यथा आहे.

महाराष्ट्रालाही न्याय मिळेल, ओबीसी आरक्षणासह निवडणुका होतील : छगन भुजबळ
कोरोनानंतर सर्व गाड्या पूर्ववत झाल्यानंतरही कोकण रेल्वेने वरील सुविधा अद्याप पूर्ववत केलेल्या नाहीत. ही गाडी कोरोना काळात दिव्यावरुन रत्नागिरीसाठी सोडली जात असल्याने मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये राहणार्‍या प्रवासी जनतेला ही गाडी पकडून कोकण गाठणे अत्यंत गैरसोयीचे झाले आहे. कोकण रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात दिवा वीर व पुढे दिवा खेड गाडी चालत असे. ज्या स्थानकांनी आणि प्रवाशांनी खर्‍या अर्थाने कोकण रेल्वेचे उद्घाटन केले त्या माणगाव, महाड, खेड तालुक्यातील प्रवाशांची आजची स्थिती दयनीय आहे.

दादर चिपळूण गाडीची मागणी अद्यापही पूर्ण केली जात नाही. याबाबत प्रवासी जनतेच्या वतीने अक्षय मधुकर महापदी, कळवा (ठाणे) यांनी दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत चालवली म्हणून पाठपुरव्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, खा. सुनील तटकरे, खा. विनायक राऊत आ. योगेश कदम, आ. शेखर निकम, आ. भरतशेठ गोगावले, ना. अनिल परब, ना. आदितीताई तटकरे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना निवेदन दिले आहे.

ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले…

रेल्वेने ५०१०४ रत्नागिरी दिवा पॅसेंजरला काही आरक्षित डबे द्यावेत तसेच संगमेश्वर, चिपळूण, खेड येथे उघडणारे अनारक्षित डबे पूर्ववत करावेत व महाड (वीर स्थानक) व माणगाव तालुक्यांना देखील प्रत्येकी एक अनारक्षित डबा राखीव ठेवावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे अक्षय महापदी यांनी केली आहे.

Recharge Plans: एकही रुपया अतिरिक्त न देता वापरा अनलिमिटेड डेटा, ‘ही’ कंपनी ग्राहकांना देत आहे खास बेनिफिट्स; पाहा डिटेल्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here