सांगली: करोनामुळे संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या इस्लामपुरातून चांगली बातमी हाती आली आहे. इस्लामपुरात आतापर्यंत २५ जणांनी करोनाला मात देण्यात यश मिळवले असून आरोग्य यंत्रणेच्या अथक प्रयत्नामुळेच हे यश मिळाले आहे.

इस्लामपूर येथील करोनाबाधीत कुटुंबाशी संबंधित सध्या आयसोलेशन कक्षात उपचार घेत असलेलं लहान बाळ तसेच त्याच्या मातापित्यांची दुसरी करोना चाचणीही निगेटिव्ह आली आहे. त्यांना आता उद्या इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांपैकी २२ रुग्ण आधीच करोनामुक्त झाले होते. आज या तिघांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २५ झाली आहे.

दरम्यान, वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथे करोनाबाधीत आढळल्याने इस्लामपूर नगरपालिकेने तातडीची बैठक घेतली आणि इस्लामपूर शहरात आणखी तीन दिवस १०० टक्के लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवार, १५ एप्रिल ते शुक्रवारी १७ एप्रिलपर्यंत शहर पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. औषध दुकाने आणि वैद्यकीय सेवा वगळता संपूर्ण व्यवहार बंद राहणार आहेत. बँकांनीही आपले व्यवहार बंद ठेवावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here