Yawatmal Rain News : यंदाचा उन्हाळा सर्वांनाच कासावीस करणारा ठरला आहे. उन्हाचा पारा सातत्याने 44 ते 45 अंशाच्या आसपास असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सकाळीच नऊच्या आत घरात अशी स्थिती असताना शेतकरी मात्र, खरीप हंगामासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत शेतात घाम गाळताना दिसत आहेत. शेतकरी जमिनीची मशागत करुन खरीप हंगामातील पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. अशातच यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, महागाव तालुक्याला पावसाने झोडपले आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली. या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाली आहे. या पावसामुळे शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तसेच शेतात देखील पाणी साचल्याचे दिसून आले. दरम्यान, या पावसामुळे उष्णतेचा त्रास कमी झाला आहे. नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

पुढील 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता

दरम्यान, हवामान विभागाने पुढील 4 ते 5 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातही काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे. वाढलेल्या उकाड्यामुळं अंगाची लाहीलाही झाली आहे. त्यामुळे चातकासोबतच सर्वसामान्यही पावसाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. अशातच अंदमानात मान्सूनचं आगमन झालं आहे. तब्बल 6 दिवस आधीच मान्सून अंदमानात पोहोचलाय. त्यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. अंदमानात लवकर हजेरी लावल्यामुळं आता राज्यातही सर्वत्र वरुणराजाचं लवकरच आगमन होणार आहे. 

6 जूनला मुंबईत तर 11 जूनला मराठवाड्यात मान्सून येणार?

मान्सून 27 मे रोजी तो केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. आता आहे तशीच स्थिती अनुकूल राहिल्यास मान्सून 6 जूनला मुंबईत तर 11 जूनला मराठवाड्यात पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच, 11 जूनपर्यंत मान्सून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी खंड पडल्यानं 10 जुलैपर्यंत या भागांत मान्सूनची प्रतीक्षा करावी लागली होती. त्या तुलनेत यंदा महिनाभर आधीच वरुणराजाचं आगमन होण्याचे संकेत आहेत. 
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here