नागपूर : बुटीबोरीतून यवतमाळचा युवा व्यावसायिक रहस्यमरित्या बेपत्ता झाल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मंदार प्रकाश देशमुख (वय ३५ रा. टिळक वॉर्ड ,यवतमाळ), असे या व्यावसायिकाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंदारचे यवतमाळ येथे मंगल कार्यालय आहे. तो शेती साहित्य विक्रीचाही व्यवसाय करतो. मंदारच्या बहिणीवर नागपुरातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. बुधवारी त्याच्या बहिणीला सुटी झाली. मंदार हा आई, बहिणीसह कारने यवतमाळ येथे परत जात होता. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास लघुशंकेला जायचे असल्याचे सांगून चालकाला कार थांबविण्यास सांगितली. चालकाने बुटीबोरीतील मयूर ढाब्याजवळ कार थांबवली. मंदार कारमधून उतरला. तो कारच्या मागे गेला. दहा मिनिटे झाल्यानंतरही तो परतला नाही. चालकाने मंदारचा शोध घेतला. परंतु तो दिसला नाही.

आणखी एका शहरात शिवसेनेत खदखद; नाराज नेते पक्षप्रमुखांना भेटणार

चालकाने कार पुन्हा नागपूरकडे वळवून मंदारचा शोध सुरू केला. काही अंतरावर मंदारची चप्पल आढळली. चालकाने त्याच्या मोबाइलवर सपंर्क साधला असता मोबाइल ‘स्विच्ड ऑफ’ होता. मंदारच्या नातेवाइकांनी लगेच बुटीबोरी पोलिस स्टेशन गाठले. मंदारची बहीण मंजिरी मोहन खोंड यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी मंदार बेपत्ता असल्याची नोंद घेत त्याचा शोध सुरू केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here