बीड : बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना पुन्हा एकदा संतापजनक घटना उघडकीस आली आहे. काही टवाळक्या तरुणांमुळे एका विवाहित तरुणीचं पोलीस होण्याचं स्वप्न भंगलं आहे. पीडित तरुणी पोलीस भरती करणाऱ्या आपल्या मित्रासोबत गेली असता दोन गुंड प्रवृत्तीच्या रोड रोमिओंनी तिला अडवून तिची छेड काढली. इतकंच नाहीतर तिला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय विवाहित तरुणी गेल्या अनेक दिवसांपासून आपलं पोलीस बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी जिवाचे रान करत आहे. गेल्या ५ मे रोजी पहाटे पावणे पाचच्या दरम्यान, पोलीस भरती करणाऱ्या आपल्या मित्रासोबत ती शहरातील चराटा फाटा परिसरातील ग्राउंडवर प्रॅक्टिससाठी गेली होती. यावेळी दोन गुंड प्रवृत्तीच्या रोड रोमिओंनी तिची गाडी आडवली. “तुझं स्कार्फ सोड, मला तुझा फोटो काढायचा आहे” असं म्हणत त्याने चाकू दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. नाशिक हादरलं! आधी मुलाचा गळा दाबला नंतर वडिलांनी केली आत्महत्या पीडितेच्या संपूर्ण शरीरावर जखमा
मात्र, आपला जीव वाचवण्यासाठी तिने आपली स्कूटी चालू करत तिथून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. पण रोड रोमिओंनी तिचा पाठलाग करत तिला स्कुटीवरून खाली पाडलं. यामुळे तिच्या पूर्ण शरीरावर जखमा झाल्या आहेत. पोटाला जवळपास १५ टाके पडले आहेत. तर चेहऱ्यावरही मोठी दुखापत झाल्याने हनुवटीला टाके आहेत. इतकंच नाहीतर हात आणि पायालाही जखमा झाल्या आहेत. सध्या पीडित तरुणीवर शहरातील लोट्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून नेमकं त्या दिवशी काय घडलं? याची माहिती पोलीस घेत आहेत.
याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दोन नराधम गुंडांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी याची दखल घेत एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
दरम्यान, पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. खरंतर, बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुठे चिमुकलीवर बलात्कार तर कुठे विवाहितेवर सामूहिक बलात्काराच्या घटना घडत आहेत. यामुळे आता कायद्याने कारवाई होईलच, मात्र ही घातक प्रवृत्ती कधी थांबणार ?असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.