मुंबई : मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून गायब असणारे मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अखेर दिलासा मिळाला आहे. या दोन्ही नेत्यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना काही अटीही घातल्या आहेत.

‘संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला असून त्यांना २३ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पोलिसांच्या तपासाला सहकार्य करावं लागणार आहे. तसंच या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला आणि १६ तारखेला त्यांना पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागेल,’ अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. तसंच देशपांडे आणि धुरी यांनी तपासाला सहकारी न केल्यास त्यांचा अटकपूर्व जामीन रद्द करावा, यासाठी पोलीस न्यायालयात जाऊ शकतात, असंही घरत म्हणाले.

‘इकडे मशिदी खोदण्यापेक्षा, चीनच्या ताब्यातील कैलास मानसरोवर मिळवून दाखवा’

मनसेचे नेते का झाले होते गायब?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध करत ४ मे रोजी पक्षातील कार्यकर्त्यांना मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यभरात पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. याच दिवशी शिवाजी पार्क येथे पोलीस ताब्यात घेत असताना संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी आपल्या खासगी वाहनातून पोलिसांसमोरच पळ काढला. यावेळी झालेल्या गोंधळात एक महिला पोलीस कर्मचारी रस्त्यावर पडून जखमी झाली. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या या दोन्ही नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here