मिळालेल्या माहितीनुसार, द्वारका येथील पौर्णिमा बस स्टॉप येथे ही घटना घडली आहे. लुटमारीच्या प्रकरणातून हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी डोक्यात दगड घालून हरीश पाटील यांची हत्या केली. पहाटे साडेपाच ते ६ वाजताच्या सुमारास हा खून झाल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच गुन्हे विभागाचे उपायुक्त संजय बारकुंड पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करण्यात येत आहे.
दरम्यान, नाशिक शहरात गेल्या चार दिवसांत घडलेली हत्येची ही तिसरी घटना आहे. पोलीस आयुक्तांनी नुकतीच पोलीस निरीक्षकांची खांदेपालट केली आहे. मात्र तरीही शहरात गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश आलं नसल्याचं दिसत आहे. वाढत्या गुन्हेगारी कृत्यांमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून गुन्हेगारांच्या मुसका आवळण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.