मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून रोजी होणाऱ्या बहुचर्चित अयोध्या दौऱ्याला अखेर स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय कारणास्तव राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचं मनसेतील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे राज यांनी हा दौरा रद्द केल्याची टीका त्यांच्या राजकीय विरोधकांकडून करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी तिरकस शैलीत भाष्य करत राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

‘इतर पक्षाचे ५ जून रोजी अयोध्येत काही कार्यक्रम होते. मात्र त्यांनी ते कार्यक्रम रद्द केल्याचं मला प्रसारमाध्यमांकडून समजलं आहे. त्यांना काही सहकार्य हवं असतं तर आम्ही ते केलं असतं. कारण अयोध्या आणि उत्तर प्रदेशात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray Ayodya Visit: अयोध्या दौरा तूर्तास स्थगित! राज ठाकरेंचं ट्विट

‘भाजपने राज ठाकरेंबाबत असं का करावं?’

‘राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात नेमक्या काय अडचणी आल्या, हे मला माहीत नाही. मात्र भाजपने त्यांच्या बाबतीत असं का करावं? यातून काही लोकांना शहाणपण आलं तर बरं होईल. कारण यामुळे महाराष्ट्रातील नेतृत्वाचं आणि महाराष्ट्राचं नुकसान होतं. आम्हाला या मुद्द्यावरून राजकारण करायचं नाही. आमचा एक मदत कक्ष आहे, कोणाला देवदर्शनाला जायचं असेल तर आम्ही मदत करतो,’ असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान, युवासेनेचे प्रमुख आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हे १५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते रामलल्लांचं दर्शन घेतील. तसंच इस्कॉनच्याही मंदिराला भेट देतील, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here