दुष्काळी जत तालुक्यात गेल्या बारा तासापासून मान्सूनपूर्व धुवाधार असा पाऊस सुरू आहे. पूर्व भागात पावसाची संततधारही अद्याप कायम आहे. गेल्या अनेक वर्षातील हा सर्वात मोठा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी दुपारी सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे. पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी सतत बरसत आहेत.
या पावसाने कोकणची अनुभूती येत आहे. तालुक्यात सर्वत्र हा पाऊस सुरूच असून बहुतांशी ओढे, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. त्यामुळे वळसंग ते सोर्डी रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद झाला आहे. तसेच उमराणी, बिळुर, मुचुंडी, शेगाव, वाळेखिंडी, जत शहर आदी भागात जोरदार पाऊस झाला आहे. पावसाने मोठा दिलासा दिला असला तरी काही पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर तालुक्यातील तीर्थक्षेत्र असणाऱ्या गुड्डापुर मंदिरात पाणीच पाणी झाले आहे.
मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर गुढघाभर पाणी
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रमधील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान असून याठिकाणीही मुसळधार पाऊस पडला. यामुळे गुड्डापुर परिसरसह पावसाने मंदिर आवारात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे. या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर गुढघाभर पाणी साचले असून दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी पाण्यातून दंडवत घालून प्रदक्षिणा करावी लागत आहे. तर तीर्थक्षेत्र गुड्डापुर जलमय होण्याची ही पहिलीच वेळ आहे.