याप्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निजामपुर गावाच्या शिवारात प्रतापसिंग वसावे यांच्या शेतालगत नाल्याच्या किनाऱ्याजवळ सुतीने बांधलेलं गोणपाट आढळलं. त्या गोणपाटात दुर्गंधी येत असल्याने याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व उपनिरीक्षक भूषण बैसाणे पथकासह घटनास्थळी गेले असता गोणपाटात महिलेच्या मृतदेह आढळून आला. साकुबाई सुपड्या वळवी (६५) रा. निजामपूर ता.नवापुर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
अज्ञात व्यक्तीने साकुबाई सुपड्या वळवी यांच्या खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणपाटात टाकून नाल्याच्या किनाऱ्यावर फेकून दिला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भुषण बैसाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात आरोपीविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील करीत आहेत.