दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची दीपाली सय्यद यांची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही दिवसांपासून त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय झाल्या असून मनसे आणि भाजपवर जोरदार टीका करत आहेत. प्रामुख्याने राज ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे दोघे दीपाली सय्यद यांच्या निशाण्यावर आहेत.
‘नातेवाईकांच्या जिवावर कोणी स्वयंघोषित हिंदुजननायक नसते’
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे गुढीपाडव्याला घेतलेल्या सभेपासून आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मशिदीवरील भोंग्यांवरून मनसेने राज्यभरात आंदोलनही केले होते. तसंच अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. या मुद्द्यावरूनही दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला होता. ‘हिंमत असेल तर महाआरती ज्ञानवापी येथे करून दाखवा. अयोध्येचे श्रेय बाळासाहेबांचे आहे, तेथे उपकारांचा भोंगा कसा वाजवाल ? स्वत:चे अस्तित्व बनवावे लागते, नातेवाईकांच्या जिवावर कोणी स्वयंघोषित हिंदुजननायक नसते,’ असा टोला सय्यद यांनी लगावला होता.