पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये प्रामुख्याने मनसेचे तत्कालीन पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे आणि शहर वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शहाबाज पंजाबी हे आघाडीवर होते. याच नाराजीतून पंजाबी यांनी १५ दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधलं. मात्र आता अवघ्या १५ दिवसांतच शहाबाज पंजाबी यांनी आपली भूमिका बदलत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. (Raj Thackeray Pune Rally)

‘आमचे काही मतभेद झाले होते. त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता मी लवकरच पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहे. मनसेत मी माझ्या वयाच्या १४ व्या वर्षांपासून काम करत होतो. मला पक्षामध्ये १६ वर्ष झाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी मी शिवसेनेत प्रवेश केला. भोंग्यांसंदर्भात घेतलेला निर्णय मला पटला नव्हता म्हणून मी गेलो होतो,’ असं स्पष्टीकरण पंजाबी यांनी दिलं आहे.

राज ठाकरेंच्या पुण्यातील मेळाव्यात सर्वात मोठा प्रश्न कोणता? दीपाली सय्यद यांनी उडवली खिल्ली

शहाबाज पंजाबी यांनी का बदलला निर्णय?

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे नाराज होऊन शिवसेनेत गेलेल्या शहाबाज पंजाबी यांनी लगेच आपली भूमिका का बदलली, याची पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याबाबत स्वत: पंजाबी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मला माझ्या गुरूचा फोन आला आणि मला बोलून घेतलं. माझ्या गुरूने मला सांगितलं की, बाबा हा धार्मिक विषय नाही. हा विषय सर्व समाजासाठी आहे. हे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहेत. राज ठाकरे जे बोलत आहेत ते योग्य बोलत आहे. तू अशी काही भूमिका घेऊ नकोस. बाळा तुझी काहीतरी चूक झाली असेल, मात्र तू आपल्या घरातीलच सदस्य आहेस, आपला पक्ष हे आपले घर आहे. १६ वर्ष घरात काम केलेलं आहे. पुन्हा पक्षात ये आणि व्यवस्थित काम कर, असं मला सांगण्यात आलं. त्यामुळे मी पुन्हा मनसेत येण्याचा निर्णय घेतला आहे,’ असं शहबाज पंजाबी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शहाबाज पंजाबी हे वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मनसेने हनुमान चालीसासंदर्भात आंदोलन जाहीर केल्यानंतर कोंढवा परिसरात हनुमान चालीसा लावू देणार नाही, असं वक्तव्य शहाबाज पंजाबी यांनी केले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आपली भूमिका जाहीर केल्यानंतर ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले त्यांमध्ये पंजाबी यांचाही समावेश होता. मनसेने जर हनुमान चालीसा लावला, तर आमची मुले तयार आहेत, असं प्रतिआव्हानही पंजाबी यांनी दिले होते. या वक्तव्यानंतर मनसेने पंजाबी यांच्याविरोधात कोंढवा पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती. हेच शहाबाज पंजाबी पुन्हा स्वगृही परतणार असल्याने त्यांचे पक्षात नक्की कसे स्वागत होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here