पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील लिंबाळा हुडी येथील अंकुश साबळे व त्यांची पत्नी अनुराधा साबळे हे दोघेजण ऑटोने आज सकाळी हिंगोलीकडे येत होते. त्यांची ऑटो हिंगोली ते सेनगाव मार्गावर ब्रह्मपुरी पाटीजवळ आली असताना अंकुश साबळे याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ऑटो समोरून येणाऱ्या कारवर जाऊन आदळली.
या अपघातामध्ये अंकुश व अनुराधा या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर हिंगोली येथून सेनगांवकडे जाणाऱ्या कारमधील सेनगांव पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुभाष चव्हाण हे देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. बी. पोटे, जमादार पी.जी. डवले, महाजन यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दोन्ही मयतांना उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणात अद्यापपर्यंत नरसी नामदेव पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
दरम्यान, या मार्गावर मागील काही दिवसांपासून अपघात वाढू लागले असून शुक्रवारीच टेम्पो कारच्या भीषण अपघातात एक जण ठार झाला होता. त्यानंतर आज कार व ऑटो अपघातात दोघेजण ठार झाले. त्यामुळे आणखी रस्ते अपघातात किती जणांचे बळी जाणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.