मुंबई- जेव्हा एका सिनेमाचा पुढचा भाग येतो तेव्हा त्या सिनेमाची तुलना पहिल्या भागाशी होणं स्वाभाविक असतं. त्यात जर सिनेमा १५ वर्षांपूर्वी आलेल्या सिनेमाचा पुढील भाग असेल तर मधल्या काळात बरंच काही घडून गेलेलं असतं. इतक्या काळानंतर सिनेमाचा दुसरा भाग येणार म्हणजे प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असेल किंवा पहिल्या भागातील कलाकारांपेक्षा वेगळे कलाकार असल्याने त्यांचा प्रभाव कसा पडेल असे अनेक प्रश्न समोर असतात. अशाच काहीशा वातावरणात हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या घुमल्या. अक्षय कुमार प्रमाणेच कार्तिक आर्यनची हॉरर कॉमेडी प्रेक्षकांना आवडल्याचीच ही पावती आहे.

भुल भूलैय्या २ या सिनेमाची प्रेक्षकांच्या मनात खूपच उत्सुकता होती. मनोविकार तज्ज्ञ डॉ. आदित्य आणि भुताची बाधा झालेली मंजुलिका यांची केमिस्ट्री १५ वर्षांपूर्वी भन्नाट जुळली होती. अक्षय कुमार, विद्या बालन, अमिषा पटेल आणि शायनी आहुजा यांनी या सिनेमाची चौकट पूर्ण केली होती. सिनेमाच्या दुसऱ्या भागात मात्र सगळेच कलाकार बदलण्यात आल्याने सिनेमा आवडेल की नाही ही शंका सिनेमाच्या टीमच्या मनात होती. पण भुल भूलैय्या २ च्या नव्या संचातील कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकण्यात बाजी मारली.

भुल भूलैय्या २ या सिनेमात कार्तिक आर्यनचा भीतीदायक नखरा प्रेक्षकांना खूप आवडल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. सिनेमातील आदित्यची भूमिका बजावण्यात कार्तिकला सूर सापडल्याचे त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरील कमेंटमध्ये म्हटलं आहे. दोन वर्षांपासून या सिनेमाची चर्चा सुरू होती, अखेर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येताच प्रेक्षकांनी आर्यनवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

तब्बूचा अभिनयही आवडल्याचे प्रेक्षकांनी टवीटर, इन्स्टा या सोशल मीडियावर सांगत या सिनेमाचं कौतुक केलं आहे. अक्षयकुमार तर चांगला होताच पण कार्तिकने निराशा केली नाही असं काही नेटकऱ्यांनी म्हटल्याने सध्या कार्तिकला आकाश ठेंगणं झालं आहे. तर कियारा आणि कार्तिकची ऑनस्क्रिन केमिस्ट्री छान वाटत असल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here