भाजपनं आतापर्यंत मिळवलेलं यश अनेकांना खूप वाटलं असेल. देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करत आहे. या कालावधीत देश मोठ्या स्वप्नांवर काम करत आहे. भाजपचा कार्यकर्तादेखील थांबणार नाही. तो नव्या लक्ष्यांवर काम करेल. भाजप कार्यकर्त्यांना निवांत, निश्चिंत बसण्याचा हक्क नाही, असं मोदी म्हणाले. आपल्या ४० मिनिटांच्या संबोधनात त्यांनी एनडीए सरकारचं काम, पक्ष आणि देशाची सद्यस्थिती यावर भाष्य केलं.
भाजपचं वैभव पुढील २५ वर्षे टिकवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करायला हवा. प्रत्येक नागरिकाला कल्याणकारी योजनांचा लाभ मिळायला हवा, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी ‘हर घर भाजप, हर गरीब का कल्याण’, अशी घोषणा दिली. निवडणुकीच्या कालावधीत ज्याप्रकारे लोकांच्या घरांमध्ये जाता, त्याचप्रकारे कार्यकर्त्यांनी लोकांच्या घरांमध्ये जायला हवं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांनी जे स्वप्न पाहिलं, ते साकार करणं हेच आपलं ध्येय असल्याचं मोदींनी सांगितलं.
देशातील १३० कोटी लोकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत करायला हवी. संपूर्ण जग भारताकडे आशेनं पाहत आहे. लोकांच्या अपेक्षांमुळे आपल्यावर असलेली जबाबदारी वाढली आहे. देशानं पुढील २५ वर्षांसाठी आपलं लक्ष्य निश्चित केलं आहे. भाजपनंदेखील आपलं ध्येय निश्चित करायला हवं. आपल्याला लोकांच्या आशा पूर्ण करायला हव्यात. देशासमोरच्या समस्या लोकांसोबत सोडवायला हव्यात, असं मोदी म्हणाले.