पुणे : अनेकदा आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींना, नाती, पैसा, यश यांना आपण गृहित धरतो; त्यामुळे या गोष्टी आपल्याकडे असूनही त्यांच्यातून मिळू शकणाऱ्या पूर्ण आनंदाला, अनुभवाला आपण मुकतो. जाणीवपूर्वक आपण यासाठी कृतज्ञ राहू. तेव्हा तुम्हीच अनुभवून पाहा, आनंद किती वाढेल ते.
कृतज्ञता आपण लहानपणापासून आध्यात्मिकतेच्या, तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने शिकत आलो आहोत. आज मानसशास्त्राच्या दृष्टीने कृतज्ञतेचे महत्त्व खूप वाढलेले आहे, त्यावर बरेच संशोधनही होत आहे. आपल्याला कोणाकडून काही मदत वा दयाळू प्रतिसाद मिळाला, कोणी आपल्यासाठी काही कार्य केले, तर आपण त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. बरोबर? हे कृतज्ञतेचे आपल्या रोजच्या आयुष्यातले उदाहरण.
मात्र, आपल्या मनासाठी कृतज्ञता कशी काय चांगली ठरू शकते? याचा एक पैलू म्हणजे, मनापासून कृतज्ञता व्यक्त केल्याने, अनुभवल्याने आपल्याला छान वाटते. मनात सकारात्मक भावना तयार होते. ‘थँक यू’ म्हणणाऱ्याच्या आणि स्वीकारणाऱ्याच्या, अशा दोघांच्याही मनाला त्यामुळे छान वाटते. दुसरे म्हणजे, त्यामुळे आपणही इतरांशी चांगले वागावे, अजून मदत करावी अशी ‘पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट’चीही उदाहरणे संशोधनांतून सिद्ध झाली आहेत. मात्र, सर्वांत जास्त चांगला परिणाम होतो, तो आपल्या मानसिक आरोग्याला पुष्टी देण्याचा, नकारात्मक भावना व मानसिक ताण कमी करण्याचा, झोप व झोपेचा दर्जा सुधारण्याचा आणि एकूणच आपल्या मनाची सकारात्मकता वाढवण्याचा.
कृतज्ञतेच्या अभावामुळे खास असे काही दुष्परिणाम नसले, तरी संशोधनांमध्ये कृतज्ञता रोज जाणीवपूर्वक आचरणात आणणारा गट आणि तसा कोणताही बदल न केला गेलेला गट यांच्यात ठळक फरक दिसून आला. त्यांच्या आयुष्याचा व नात्यांचा दर्जा, एकूण आनंद, भविष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन, मानसिक ताण तणाव, शारीरिक आरोग्य अशा अनेक ठिकाणी कृतज्ञतेने आपले सकारात्मक परिणाम दाखवून दिले; शिवाय युद्धातील सैनिक, अग्निशामकदलाचे सैनिक, विविध प्रदीर्घ शारीरीक आजारांनी ग्रस्त रुग्ण यांसारख्या तणावपूर्ण परिस्थितीतून जाणाऱ्या व्यक्तींनाही कृतज्ञतेचे सकारात्मक परिणाम दिसून आले.
तुम्ही म्हणाल, म्हणजे फक्त ‘थँक यू’ म्हणून आपण मानसिकदृष्ट्या सकारात्मक आणि सुदृढ राहू शकतो?!
याचे उत्तर थोडे संदिग्ध आहे. आभार मानण्याचे फायदे आपल्याला तेव्हा मिळतात, जेव्हा ते आभार मनापासून आणि सातत्याने मानले जातात. खरेच आपल्या मनात खोलवर जाऊन ती कृतज्ञतेची भावना अनुभवणे, खरोखर ती ‘फील’ करणे हे त्यासाठी गरजेचे आहे; शिवाय कोणी इतरांनी आपली काही मदत करण्याची वाट पाहण्यापेक्षा, आधीच आपल्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत, आपली सुखवस्तू जीवनशैली आहे, त्याबद्दल कृतज्ञता रुजवायला हवी. ती सतत आपल्या मनात ठेवायला हवी.
आपल्या आयुष्यात व आसपासच्या जगात सर्व प्रकारच्या चांगल्या-वाईट गोष्टी, वस्तू, घटना व व्यक्ती आहेत. सकारात्मकही आहेत आणि नकारात्मकही आहेत. त्यांतून आपले लक्ष्य कुठे केंद्रित करायचे, ही निवड, हा निर्णय मात्र आपल्या हाती आहे. ही सकारात्मकतेच्या निवडीची प्रक्रिया मानसिक आरोग्यासाठी पोषक आहे हे आपण पाहिलेच आहे. कृतज्ञतेची सवय लावली, की सोपे होईल. कृतज्ञतेची मानसिक सवय ही आपल्या मनाला सकारात्मक करायला, सकारात्मक दृष्टिकोन घडवायला भक्कम आधार देते. एक प्रकारे ही सवय आपल्या मेंदूचे ‘सॉफ्टवेअर अपडेट’ करते. ते जुन्या त्रुटीयुक्त, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेते.
ही सवय मात्र सखोल असायला हवी. ती फक्त वर वर ‘थँक यू’ म्हणण्यापुरती मर्यादित असेल, तर त्याचे फायदेही मर्यादित राहतील. ही सखोल सवय लावण्यासाठी आपण दोन पातळ्यांवर त्याचा सराव करू शकतो.
तुम्ही स्वतःवर काम करण्यासाठी आणि निरोगी मानसिक सवयी लावण्यासाठी एव्हाना एखादी वही केली असेलच. ती घ्या. ती नसेल तरी साधा कागद पेन किंवा रफ वही घेतली तरी चालेल. त्या मध्ये तुमच्या आयुष्यात आत्ता असलेल्या शंभर गोष्टींची यादी करा, ज्याच्याबद्दल तुम्ही खरेच मनापासून कृतज्ञ आहात.
तुमचे घर, घरातल्या काही वस्तू, फर्निचर, रोज खायला मिळालेले अन्न, पाणी, नाती, प्रेमळ माणसे, कपडे, धडधाकट शरीर, वाचायला मदत करणारे डोळे, ऐकणारे कान, चवीचे अनुभव देणारी जीभ, सुगंधासाठी नाक, सगळे सगळे सुचणारे लिहून काढा. प्रत्येक गोष्ट लिहिताना मनात त्या गोष्टीविषयी, अवयवाविषयी खरी, जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगा. या सगळ्या गोष्टींना मनातून किंवा लिहून ‘थँक यू’ म्हणा. वाटल्यास या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या म्हणून देवाचे किंवा निसर्गाचे किंवा विज्ञानाचे आभार माना. अगदी मनापासून हा विचार करा, की मी खरेच किती नशीबवान आहे, की हे सर्व माझ्याकडे आहे. पैसा, यश, तुमच्या अचिव्हमेंट्स यासाठीही कृतज्ञता बाळगा. दिवसातून एकदा तरी या यादीकडे रोज या. ती वाचा. त्या आभाराच्या, कृतज्ञतेच्या भावना मनातून पुन्हा पुन्हा निर्माण करा. एखादी नवी गोष्ट रोत त्यात लिहा.
एका ऑनलाइन वर्कशॉपमध्ये एका विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला होता, की आता तर करोनाचे एवढे मोठे संकट जगासमोर आहे. अशा वेळी काय कृतज्ञता ठेवणार आपण?
इथेच तर खरे फायदे आहेत कृतज्ञतेचे. जेव्हा उघड उघड पाहता आपल्या आसपास, आपल्या आयुष्यात सगळे वाईट चालले आहे, असे वाटत असते, तेव्हा आपल्या मेंदूला खरी चालना मिळते कृतज्ञ व सकारात्मक राहण्यासाठी. ‘आभार मानण्याजोग्या कोणत्या गोष्टी आहेत?’ या प्रश्नाला थोडा अजून खोलात जाऊन विचार केला, की उत्तर नक्की मिळेल. जसं की कोव्हिड लॉकडाउनमध्ये, स्वच्छ प्रदूषणमुक्त हवा, स्वच्छ समुद्र, घरच्यांसोबत वेळ, पाककृती, कलाकृतींना संधी आणि वेळ मिळाला या आभार मानण्यासारख्याच गोष्टी नाहीत का?
आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टी ‘परफेक्ट’ असतील असेही नाही. कुणाला तरी बहुधा एका कानाने कमी ऐकू येत असेल किंवा पैसे हवे तितके मिळत नसतील, तरीही जेवढे ऐकू येतेय त्याकडे लक्ष केंद्रित करा आणि तेवढे तरी ऐकू येतेय या गोष्टीसाठी आभार माना. जेवढे पैसे मिळताहेत ते किती उपयोगी ठरतायत त्यासाठी आभार माना.
Adv: मेगा समर डेज – ट्रेंडिंग एसी, फ्रिज आणि इतर उपकरणांवर भन्नाट डिल्स
याचा अर्थ आपण अल्पसंतुष्ट राहायचे का? आहे तिथेच थांबायचे का? पुढे प्रगती करायचीच नाही का? तर याचे उत्तर आहे, ‘नाही.’ तिथल्या तिथे अडकून पडायची अजिबात गरज नाही. कृतज्ञ राहणे म्हणजे जे चांगले आहे त्याची सकारात्मक जाणीव ठेवणे. त्या पलीकडे जाऊन अजून चांगल्या गोष्टींकडे प्रगती करण्यासाठी कृतज्ञता आपल्याला मुळीच अडवत नाही. कृतज्ञ राहूनही आपल्याला प्रगती करता येते. उलट प्रगतीला कृतज्ञता पोषक असते असेही काही तत्त्वज्ञ सांगतात.
अनेकदा आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींना, नाती, पैसा, यश यांना आपण गृहित धरतो; त्यामुळे या गोष्टी आपल्याकडे असूनही त्यांच्यातून मिळू शकणाऱ्या पूर्ण आनंदाला, अनुभवाला आपण मुकतो. जाणीवपूर्वक आपण यासाठी कृतज्ञ राहू. तेव्हा तुम्हीच अनुभवून पाहा, आनंद किती वाढेल ते.
दुसरी पातळी म्हणजे, आपले दैनंदिन जीवन. रोजच्या दिनचर्येमध्येही कळत-नकळत आपल्यासोबत काही तरी चांगले घडत असते. अगदी आजची भाजी मस्त झाली होती, त्यापासून ते आज रस्त्याने ट्रॅफिक कमी लागले येथपर्यंत. छोट्या-मोठ्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक कृतज्ञ मनाने पाहा. बॉसने कौतुक केले, बागेतल्या झाडावर टपोरे फूल उमलले, नवा क्लाएंट मिळाला किंवा अगदी आज झोप मस्त गाढ लागली, या गोष्टीही कृतज्ञता व्यक्त करण्यासारख्याच आहेत. हे दिवसभरातून आठवेल तेव्हा करत राहा. सकाळी स्वतःला आठवण करून द्या, की आज मला हा दैनंदिन कृतज्ञतेचा मानसिक सराव करायचा आहे. जसे तुम्ही कृतज्ञतेला आपलेसे कराल, तसे कृतज्ञता तुम्हाला अजून अजून आनंद, मनःशांती, प्रगती व मानसिक आरोग्य देत राहील.
(लेखिका लाइफ कोच आहेत.)