रात्रीच्या सुमारास हा धाडसी दरोड्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कवठेमहांकाळचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्यासह अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत पाहणी केली. तसेच दरोडेखोरांच्या शोधासाठी जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करण्यात आलेली आहे. तसेच पथकेही रवाना करण्यात आली आहेत. पण या एटीएम मशीनमध्ये नेमकी किती रक्कम लंपास करण्यात आली हे समजू शकले नाही.
अशी घडली एटीएमची चोरी…
मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र बँकेचे एटीएम सेंटर या ठिकाणी दरोडेकर पोहोचले. पहिल्यांदा दरोडेखोरांनी सेंटर मधील सर्व सीसीटीव्हीवर काळा कलर मारला. त्यानंतर एटीएम सेंटरमध्ये घुसून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. यातील एका एटीएम मशीनमध्ये पैसे नसल्याने ते एटीएम मशीन सोडून भरलेले एटीएम मशीन दोरीने गाडीला बांधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ते एटीएम मशीन गाडीमध्ये घालून चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता आजुबाजूच्या नागरिकांना जाग आली. त्यांनी दरोडेखोरांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करून मशीनसह पोबारा झाले.