एखादी महिला रेल्वेतून प्रवास करत असेल आणि तिच्याकडे तिकीट नसेल, तरीही टीटीई तिला खाली उतरवू शकत नाही, असा रेल्वेचा एक नियम आहे. रेल्वेसाठी नियम-कायदे तयार करणाऱ्या रेल्वे बोर्डानं तीन दशकांपूर्वीच्या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचं ठरवलं आहे. रेल्वेच्या या कायद्याची रेल्वेच्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांनादेखील कल्पना नाही. रेल्वेतून एकट्यानं प्रवास करत असलेल्या महिलेला कोणत्याही स्टेशनवर उतरवण्यात आल्यास अनुचित घटना घडण्याचा धोका असतो. त्यामुळेच एकट्या प्रवासी महिलांच्या सुरक्षेसाठी १९८९ मध्ये कायदा करण्यात आला. भारतीय रेल्वेच्या नियमावलीनुसार एकटीनं प्रवास करत असलेल्या महिलेकडे तिकीट नसल्यासही तिला कोणत्याही स्थानकात उतरवलं जाऊ शकत नाही. त्यासाठी टीटीईला जिल्हा मुख्यालयाच्या स्टेशनवर कंट्रोल रुमला सूचना द्यावी लागते. तिथे तिला दुसऱ्या ट्रेनमध्ये तिकिटासह बसवून देण्याची जबाबदारी जीआरपीच्या महिला हवालदाराची असते.
भारतीय रेल्वेनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी गेल्या काही वर्षांपासून बरेच प्रयत्न केले आहेत. यामध्ये महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांचा समावेश आहे. महिलांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठीही रेल्वे अधिक प्रयत्नशील आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी रेल्वे बोर्ड एकाचवेळी अनेक आघाड्यांवर काम करत आहे.