कोलकात्यामधील तृणमूलच्या कार्यालयात अर्जुन सिंह यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. समाजात दुही निर्माण करणाऱ्या पक्षाला सिंह यांनी नाकारल्याचं म्हणत अभिषेक बॅनर्जींनी सिंह यांचं तृणमूलमध्ये स्वागत केलं. एसी खोल्यांमध्ये बसून राजकारण होत नाही, असा टोला सिंह यांनी पक्ष प्रवेशानंतर पश्चिम बंगाल भाजपला लगावला. राज्यात भाजपचा आलेख घसरतो आहे. जमिनीवर उतरून राजकारण करण्यात कोणालाच रस नसल्यानं ही वेळ आल्याची टीका त्यांनी केली.
खासदार अर्जुन सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीला जाऊन पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. पश्चिम बंगालमध्ये पक्षात सुरू असलेलं अंतर्गत राजकारण त्यांनी वरिष्ठांच्या कानावर घातलं होतं. ज्यूट मिल्सचा मुद्दादेखील त्यांनी उपस्थित केला होता. तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारादेखील सिंह यांनी दिला होता. केंद्रात ज्यूट उत्पादन मंत्री असलेल्या पियूष गोयल यांच्या धोरणांवरही त्यांनी कडाडून टीका केली होती. वस्त्रोद्योग मंत्रालय मनमानी निर्णय घेत असल्याचं सिंह म्हणाले होते.
ज्यूटच्या किमती निश्चित करण्यात हस्तक्षेप करण्याची मागणी सिंह यांनी अर्जुन सिंह यांनी केली. वस्त्रोद्योग मंत्रालयासमोर हा विषय उपस्थित करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला. अर्जुन सिंह तृणमूलमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे केंद्रापासून राज्यापर्यंतचे नेते त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सिंह यांचं मन वळवण्यात त्यांना अपयश आलं.