मुंबई: केंद्र सरकारनं काल पेट्रोल डिझेलवरील अबकारी कर कमी केल्यानंतर आता राज्य सरकारनंही सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने VAT कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने देखील आजपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाला सुमारे २५०० कोटी रुपये भार पडणार आहे.

केंद्र सरकारने काल मोठा निर्णय घेतला. पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी करण्याच्या केंद्राच्या निर्णयाने पेट्रोलचा दर ९.५० पैसे आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी झाला. केंद्र सरकारनं कर कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने देखील यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरु लागली होती. अखेर ठाकरे सरकारनंदेखील सर्वसामान्यांच्या मागणीला प्रतिसाद देत पेट्रोल डिझेलवरील VAT कमी करण्याचा निर्णय घेतला.
पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केले, राज्याच्या तिजोरीवर वर्षाला २५०० कोटी रुपये भार पडणार
व्हॅट कपातीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर १०९.२७ रुपयांवर आला आहे. तर एक लीटर डिझेलसाठी ९५.८४ रुपये मोजावे लागणार आहेत. पुण्यात पेट्रोलचा दर ११०.८७ रुपयांवर, तर डिझेलचा दर ९५.३६ रुपयांवर आला आहे. औरंगाबादेत पेट्रोलचा दर ११२.९९ रुपये आहे. तर डिझेलचा दर ९८.९१ रुपये आहे. नाशकात एक लीटर पेट्रोलसाठी १११.७३ रुपये, तर डिझेलसाठी ९६.१९ रुपये मोजावे लागत आहेत. तर नागपुरात पेट्रोलचा दर १०९. ७३ रुपये, तर डिझेलचा दर ९५.४२ रुपये इतका आहे.

केंद्र आणि राज्याने कमी केलेल्या करामुळे दोनच दिवसांत पेट्रोल आता ११ रुपये ५८ पैशांनी स्वस्त झालं आहे. तर डिझेल ८ रुपये ४४ पैशांनी स्वस्त झालं आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्णयाने महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here