तर, मोदी सरकार राजकीय नौटंकी करण्यात पुढे आणि दिलासा देण्यात मागे असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ता गौरव वल्लभ यांनी रविवारी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. ‘अर्थव्यवस्थेबाबत आणि आर्थिक व्यवस्थापनाबाबत भाजप सरकारचे अज्ञान अनेक दिवसांपासून सर्वश्रुत आहे. हे मान्य करून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याऐवजी भाजप फसवणुकीतून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. एकामागोमाग ट्वीट करीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही गोंधळ निर्माण करण्याच्या उद्देशाने अनेक पावले उचलण्याची घोषणा केली’, असा आरोप वल्लभ यांनी केला.
आकडेवारीचा हवाला देत वल्लभ यांनी असा युक्तिवाद केला की, अर्थमंत्र्यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर ६ रुपये कपात करण्याची घोषणा केली. ही लक्षणीय कपात वाटत असली तरी, त्याने काही फरक पडणार नाही. गेल्या ६० दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर १० रुपयांनी वाढले. ताज्या करकपातीमुळे पेट्रोलचे दर प्रति लिटर ९.५ रुपयांनी घटले आहेत, तर डिझेलचे दर ७ रुपयांनी घटले आहेत. ही फसवणूक नाही का?, असा सवाल वल्लभ यांनी केला. स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत गेल्या १८ महिन्यांमध्ये ४०० रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. आता २०० रुपयांचे अनुदान देणे म्हणजे लोकांचे कल्याण नव्हे, तर थोडे थोडे रक्त शोषणे आहे, अशी टीका वल्लभ यांनी केली.