दिवा विभागात भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी नितेश राणे यांनी राज्य सरकारचा जोरदार समाचार घेतला. ‘ केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. मात्र राज्यातील सत्ताधाऱ्यांना एक टक्का लाज उरली आहे वाटतं, त्यामुळे त्यांनी काहीतरी दिखावा केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही राज्य सरकारकडे इंधनावरील कर कमी करण्याची मागणी करत होतो. मात्र नंतर आम्हाला समजलं आर्थिक बजेटचा उद्धव ठाकरे यांच्याशी काहीही संबंध नाही. त्यांना फक्त बॅगा आणणे आणि बॅगा पोहोचवणे एवढंच येतं,’ असा टोला राणे यांनी लगावला आहे.
धर्मवीर चित्रपट आणि ठाणे जिल्ह्याचा विकास
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. या सिनेमावरूनही नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘दिघे साहेबांचं नुसतं नाव वापरायचं असेल आणि त्यांच्याविरुद्ध काम करायचं असेल तर मग चित्रपटाचा प्रमोशन का करताय? जे चित्रपटामध्ये दाखवलं आहे तसंच वस्तूस्थितीमध्ये ठाण्यात कानाकोपऱ्यात काम सुरू आहे का?’ असा सवाल त्यांनी विचारला आहे.