संजय राऊत हे सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत यांनी म्हटले की, संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याच जाहीर केले आहे. त्यांनी ही घोषणा केली होती, त्याअर्थी त्यांनी जिंकून येण्यासाठी लागणाऱ्या ४२ मतांची बेगमी केली असावी, असा माझा समज होता. पण संभाजीराजे यांच्याकडे तेवढी मते नव्हती. तेव्हा संभाजीराजे यांनी शिवसेनेकडे मदत मागितली. पण आम्हाला आमचे २ उमेदवार निवडून आणायचे आहेत, मग आम्ही त्यांना आमची मतं कशी देणार? आम्हाला शिवसेनेला उमेदवार निवडून आणायचा आहे. राज्यसभेतील संख्याबळ वाढवायचे आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाही.
त्यामुळे आम्ही संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास सांगितले. आम्ही एक पाऊल पुढे टाकले होते. संभाजीराजे छत्रपती यांनीही एक पाऊल पुढे टाकायला पाहिजे होते.आमचा कोणालाही विरोध नाही. पण राज्यसभेच्या दोन जागांवर कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचेच दोन उमेदवार निवडून जातील. ही गोष्ट मी उद्धव ठाकरे यांच्यावतीने सांगत आहे, माझ्या मनातलं काहीतरी सांगत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
संभाजीराजे कोल्हापूरला परतले
भाजीराजे यांना सोमवारी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर शिवबंधन बांधण्यासाठी या, असा निरोप देण्यात आला होता. मात्र, राज्यसभा निवडणूक अपक्ष लढण्यावर ठाम असलेल्या संभाजीराजे यांनी शिवसेनेचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती सोमवारी पहाटेच कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. संभाजीराजे यांचे सर्व कार्यकर्तेही कोल्हापूरला परतले आहेत.