या सगळ्यानंतर आता मराठा मोर्चा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढारे यांनी आज दुपारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत एखादा महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. संभाजीराजे छत्रपती हेदेखील मराठा समन्वयकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. मराठा मोर्चा समन्वयकांनी रविवारी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी मराठा मोर्चाने राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने संभाजीराजे यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती. येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी दोन जागांवर भाजप, तर उर्वरित तीन जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उमेदवार सहजपणे निवडून येईल. तर सहाव्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप आणि महाविकासआघाडी यांच्यापैकी कोणाकडेही पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे याच सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी दावा सांगितला आहे. या जागेवर निवडून येण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय आमदारांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
शिवसेना नेत्यांची शिष्टाई अयशस्वी
कालच शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने ट्रायडंट हॉटेलमध्ये जाऊन संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळात अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आणि उदय सामंत यांचा समावेश होता. या तिन्ही नेत्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना मातोश्रीचा निरोप दिला होता. उद्या दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधायला मातोश्रीवर या, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना पाठवाला होता. मात्र, आता संभाजीराजे यांनी शिवसेनेचा हा प्रस्ताव नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.