पुणे : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आल्याने सध्या या घटनेची देशभर मोठी चर्चा होत आहे. या मुद्द्यावरून दोन गट समोरासमोर आलेले असतानाच आता पुण्यातही या वादाचं लोण पोहोचलं आहे. शहरातील पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागांवर दर्गा उभारण्यात आल्याचा दावा मनसे नेते अजय शिंदे यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या मेळाव्यात केला. अजय शिंदे यांच्या या दाव्यानंतर आता शहरातील वातावरण चांगलंच तापलं असून हिंदू महासंघानेही या वादात उडी घेतली आहे.

मुघल आक्रमकांनी पुण्यातील पुण्यश्वर आणि नारायणेश्वर ही दोन मंदिरे पाडून तिथे दर्गा उभा केला. यातील एक मंदिर शनिवारवाड्याच्या समोर आहे, तर दुसरं मंदिर लाल किल्ल्याजवळ आहे, असं वक्तव्य अजय शिंदे यांनी केलं. याबाबत त्यांनी पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारला पत्रही लिहिलं आहे. तसंच या मंदिरांसाठी मनसे आगामी काळात लढा उभारणार असल्याची घोषणा अजय शिंदे यांनी केली आहे. शिंदे यांच्या या भूमिकेला हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनीही पाठिंबा दिला आहे.

संभाजीराजे छत्रपतींना शिवसेनेच्या गोटातून पाठिंबा; आमदारांकडून मातोश्रीला धोक्याचा इशारा?

पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिराबाबत पुण्यातील हिंदुत्ववादी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून आवाज उठवत आहेत. मनसेनेही या मंदिरांच्या बाजूने भूमिका घेतली असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो, असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशभरातील अनेक ठिकाणी सध्या मंदिर आणि मशिदीवरून तणाव निर्माण झालेला असताना या वादाची ठिणगी आता पुणे शहरातही पडल्याचं दिसत आहे. याबाबत आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नरसिंह रावांनी मंजूर केलेला कायदा, ज्ञानवापी वाचवण्यासाठी आधार ठरणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here