‘भूल भुलैया २’चं कथानक अपेक्षाभंग करणारं आहे. विद्या-अक्षयचा सिनेमा आशयपूर्ण होता. सीक्वेल मनोरंजन करतो; पण त्याची कथा पटत नाही. खरं तर, दोन सिनेमांची तुलना करू नये; पण एकाच शीर्षकावरून असलेल्या सिनेमांची किंवा सिनेमाचा प्रीक्वेल-सीक्वेल यांची तुलना होतंच असते. ‘भूल भुलैया २’चं तसंच काहीसं झालंय. फक्त शीर्षकामुळे तो पहिल्या सिनेमाचा सीक्वेल वाटतो. बाकी दोन्ही सिनेमांमधील कथानक, पात्र, कलाकार यांच्यात काहीच संबंध नाही; त्यामुळे ‘भूल भुलैया २’ हा सिनेमा इतर कोणत्याही शीर्षकानं प्रदर्शित केला असता, तर तो अधिक संयुक्तिक ठरला असता. सिनेमाला स्वतःची अशी स्वतंत्र ओळख मिळाली असती, जी यावेळी मिळाली नाही.
एक तांत्रिक एका हवेलीत राहणाऱ्या कुटुंबातील सूनेला (तब्बू) आत्मा/भूत असलेल्या मोंजोलिकाच्या तावडीतून वाचवतो. तांत्रिक त्या आत्म्याला त्याच हवेलीतील एका खोलीत बंद करून ठेवतो. आता सिनेमाचं कथानक १८ वर्षं पुढं जातं. काही कारणास्तव लहानपणी रीत () ज्या हवेलीत राहत होती, त्याच हवेलीत ती १८ वर्षांनंतर पुन्हा येते. या हवेलीत मोंजोलिका या आत्म्याचा वावर आहे, यावर तिचा विश्वास नसतो. या वेळी रीतबरोबर तिचा मित्र रूहान रंधावाही () असतो. काही गोष्टी अशा घडतात, की रूहान ‘आत्म्याबरोबर बोलू शकतो…’ असं त्या हवेलीतील कुटुंबाला अर्थात रीतच्या नातेवाइकांना समजतं. रीतचं निधन झाल्यामुळे आणि तिच्या आत्म्यानंच मला या हवेलीत पाठवलं असल्याचं रूहान सर्व कुटुंबियांना सांगतो. खरं तर, रीत नाटक करत असते; पण एक गोष्ट लपवण्यासाठी बोललं गेलेलं खोटं, कथानकाला नवं वळण देतं आणि या झपाटलेल्या हवेलीत सर्व कुटुंब पुन्हा राहायला येतं. या हवेतील एका बंद खोलीत मोंजोलिकाची आत्मा असण्यावर कुटुंबियांचा विश्वास असतो. त्यावर आता संपूर्ण हवेलीत रीतची आत्मा फिरत असल्याचं सांगून रूहान सर्वांची दिशाभूल करतो; पण ही दिशाभूल शेवटी रूहान आणि रीत यांनाच कचाट्यात पकडण्यास कारणीभूत ठरते.
फरहाद सामजीची पटकथा आणि आकाशचे संवाद हसवणारे आहेत. विनोदाचा मामला आपल्याला पोट धरून हसवतो; त्यामुळे कार्तिक त्याच्या उत्कृष्ट ‘कॉमिक टायमिंग’मुळे उठून दिसतो. आपली अभिनयक्षमता दाखवण्याची मिळालेली संधी कार्तिकनं अजिबात सोडलेली नाही. दुसरीकडे तब्बूनं प्रयत्नशील आणि प्रयोगशील अभिनेत्री म्हणून स्वत:ला पुन्हा सादर केलंय. ती सिनेमातील मजबूत दुवा आहे. या शिवाय संजय मिश्रा, राजपाल यादव आणि अश्विनी काळसेकर हे त्रिकूटही हास्याचा ‘डोस’ वाढवण्याचं काम करतात.
अक्षयकुमार-विद्या बालनचा ‘भूल भुलैया’ हा सिनेमा वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय दाखले देतो; पण, सीक्वेल तसे दाखले देत नाही; त्यामुळे शेवटचा सस्पेन्स आपलं मनोरंजन करतो; पण त्यावर आपण कितपत विश्वास ठेवायचा, हे त्या-त्या प्रेक्षकानं स्वतः ठरवावं. सिनेमाच्या पटकथेबद्दल अंदाज बांधला जात असल्यानं सिनेमातील रस कालांतरानं कमी होत जातो. सिनेमात थरार, विनोद, अभिनय, संगीत सर्व काही आहे; पण सिनेमात पटण्याजोगी गोष्ट नाही. उत्तरार्धात सिनेमा घाईघाईत संपलेला दिसतो. मात्र, हा सिनेमा आपलं मनोरंजन करतो; त्यामुळे डोकं बाजूला ठेवून सिनेमा पाहायचा असेल, तर पाहायला हरकत नाही.
सिनेमा : भूल भुलैया २
निर्मिती : टी सीरीज फिल्म्स, सिने १ स्टुडिओज्
दिग्दर्शक : अनीस बज्मी
लेखन : आकाश कौशिक, फरहाद सामजी
कलाकार : कार्तिक आर्यन, तब्बू, कियारा अडवाणी
छायांकन : मनू आनंद
संकलन : बंटी नांगी
दर्जा : २.५ स्टार