मुंबई: प्लाझ्मा उपचार पद्धती आणि बीसीजी लससाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री यांनी आज दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई, पुणे आणि नागपुरात करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा वाढतो आहे. आम्ही राज्यात करोना चाचण्याही वाढवल्या आहेत. रुग्णांचा शोध घेतला जात आहे. संशयितांना तात्काळ क्वारंटाइन करत आहोत, अशी माहितीही उद्धव ठाकरे यांनी दिली. महाराष्ट्रानं नेहमीच दिशा दाखवण्याचं काम केलं आहे आणि पुन्हा तसं करून दाखवू असा मला आत्मविश्वास आहे. मला विश्वास आहे की यात आपण नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मूळ तुटवडा आहे आहे तो पीपीई किट्सचा. तो पूर्ण जगात आहे. राज्यात आपण पीपीई किट्सचा पुरवठा वाढवत आहोत. या संकटाच्या काळात काही उद्योजक आपल्या राज्याला, देशाला मदत करायला पुढे येताहेत, असंही त्यांनी सांगितलं. पण डॉक्टरांची एक टास्क फोर्स बनवली आहे. उपचारपद्धती कशी असावी, याबद्दल संपूर्ण आरोग्य सेवेला या टास्क फोर्समधील डॉक्टर मार्गदर्शन करतील, असंही ते म्हणाले. मुंबईमध्ये आपण कोविड आणि नॉन – कोविड अशी विभागणी करून रुग्णालये तयार ठेवली आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

प्लाझ्मा उपचार पद्धती आणि बीसीजी लसीचा प्रयोग करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील ठळक मुद्दे:

>> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना वंदन केले. तसेच लाखो भीमसैनिक आणि नागरिकांनी देखील घरात राहूनच या महामानवाला अभिवादन केले. कुठेही गर्दी केली नाही आणि एरव्ही मोठ्या धुमधडाक्यात साजरा करणरी ही जयंती आपण साधेपणाने साजरी केली. त्यासाठी धन्यवाद. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा दिला आणि आज आपण विषाणूंशी लढा देतो आहोत.

>> हा लढा अत्यंत गांभीर्याने घ्यायला पाहिजे होता. सर्व जनतेने जिद्द, संयमाचे दर्शन आत्तापर्यंत घडवले आहे आणि पुढेही आपण घडवाल अशी खात्री आहे.

>> एकट्या मुंबईत २० ते २२ हजार चाचण्या झाल्या आहेत. २३० जणांवर आपण उपचार करून घरी पाठवले आहे. ३२ गंभीर आहेत, पण त्यांची प्रकृती स्थिर आहे. एका ६ महिन्याच्या बाळाच्या आईशी आणि ८३ वर्षांच्या एका करोनाग्रस्त वृद्ध महिलेशी मी आज सकाळी बोललो. दोघांनीही करोनाला हरवले आहे.

>> जवळपास १० जिल्ह्यांत करोना विषाणूचा प्रवेश झाला नाही. उर्वरित राज्यातून त्याला हद्दपार करायचे आहे. मुंबई -पुण्यात चाचण्यांची संख्या वाढवतो आहोत. बाधित क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काही झोन्समध्ये थोडी गैरसोय झाली असेल पण ती तात्पुरती आहे, आपण अन्नधान्याचा पुरवठा सुरळीतपणे सुरु केला आहे.

>> आज जगभर टंचाई आहे, पण वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा वाढविण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. अनेक व्यक्ती, संस्था आपल्याला मदत करताहेत. कुणी पीपीई किट देताहेत, कुणी व्हेंटिलेटर देताहेत. वैद्यकीय क्षेत्रातील २१ हजार लोकांनी आमच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

>> आता तर या युद्धात सर्व नामवंत डॉक्टर आमच्या बरोबर सहभागी झाले आहेत. या डॉक्टरांची टास्क फोर्स राज्यातील डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहे.

>> मालेगावमध्ये राहणाऱ्या माझ्या बंधू-भगिनींना मी या आजच्या निमित्ताने विनंती करतो की कृपया प्रशासनाला सहकार्य करा, या करोनाने किती मृत्यू जगभर झालेत त्याची तुम्हाला कल्पना आहे. मी मौलवींशीही बोलतोय. मी सांगू इच्छितो की हा रोग जातपात धर्म पाहत नाही. तुम्ही संकटात पडू नका आणि दुसऱ्यांना पाडू नका. प्रशासन तुमच्या चांगल्यासाठीच सांगते आहे.

>> आज उद्योग- व्यवसाय प्रदीर्घ काळासाठी बंद करणे अर्थव्यवस्थेवर ताण आणण्यासारखे आहे. जिथे करोनामुळे बिकट परिस्थिती नाही अशा जिल्ह्यांत ज्या उद्योग, व्यवसायांना त्यांचे कामगार एकाच ठिकाणी ठेऊन, त्यांना तिथेच भोजन व्यवस्था देता येण्यासारखी असेल ते करणे शक्य असेल तर उद्योग सुरूही करता येतील.

>> कोविडच्या बरोबरीने आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गट स्थापन केला आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर, अजित रानडे, दीपक पारेख, विजय केळकर यांची देखील एक समिती स्थापन केली आहे. कमीतकमी आर्थिक दुष्परिणाम कसे टाळायचे , पुढील आर्थिक आघाडीवर कसे काम करायचे आहे ते ही समिती पाहणार आहे. २० एप्रिलनंतर कोणते उद्योग व्यवसाय सुरु करता येतील त्याचा निर्णय घेण्यात येईल.

>> शेतकऱ्यांचा खरीपाचा हंगाम येतो आहे. शेतीविषयक कामे, बियाणे-अवजारे यांचा पुरवठा थांबवणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरु राहील. अर्धा एप्रिल संपला आहे. दीड महिन्यांनी पाऊस सुरू होईल. पावसाळ्यात दुर्गम भागात जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य, औषधे पुढच्या १५ -२० दिवसांत पोहचावा असे निर्देश दिले आहेत. मग त्यात गडचिरोली, अक्कलकुवा, मेळघाट असेल.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here