आम्हाला गावी जायचे आहे, अशी मागणी करत वांद्रे स्टेशनवर आज शेकडो मजुरांनी धडक दिली व तिथे ठिय्या दिला. लॉकडाऊनविरुद्ध झालेल्या या उठावावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली. ‘क्यों परेशान हो रहे है? असा सवाल करत त्यांनी हिंदीतून संवाद साधत परराज्यातील मजुरांना विश्वास दिला. १४ तारखेला लॉकडाऊन संपेल आणि ट्रेन सोडतील असं पिल्लू कुणी तरी सोडलं असावं आणि त्यातून हा सारा प्रकार घडला असावा, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या सर्वच मजुरांना विनंती केली. तुम्ही येथे पूर्णपणे सुरक्षित आहात. लॉकडाऊन संपल्यानंतर केंद्र आणि राज्य मिळून नक्कीच तुमची गावी जाण्याची व्यवस्था करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
वांद्रे येथील घटनेवरून राजकारण सुरू झाले आहे. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी चीड व्यक्त केली. यात कुणी राजकारण करणार असेल. लोकांच्या भावनांशी खेळून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणार असेल तर तो कुणीही असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही. तेव्हा आग भडकवू नका, इतकीच माझी सर्वांना विनंती आहे, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. वरिष्ठ पातळीवरचे सर्व नेते एकजुटीने उभे ठाकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आमचा राज असे सगळेच सोबत आहेत. शिवाय मुल्ला मौलवीही माझ्याशी संवाद साधत आहेत. व्हायरस जात पात धर्म पक्ष पाहत नाही, हेच या साऱ्याचे सत्य आहे. त्यामुळे जसा लढा आपण आजवर दिला आहे तसाच तो यापुढेही द्यायचा आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times