शारीरिक संबंधांमुळे मंकीपॉक्स माणसांमध्ये पसरत असल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी डेव्हिड हेमॅन यांनी बोलून दाखवली. आफ्रिकन देशांमध्ये दरवर्षी हजारो लोकांना मंकीपॉक्सची लागण होते. आतापर्यंत १२ देशांत मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनानंतर मंकीपॉक्स महामारी बनणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मंकीपॉक्स प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरतो. हा आजार कांजण्यांसारखा आहे. मात्र त्यापेक्षा कमी गंभीर आहे, अशी माहिती मुंबईतल्या चेंबूर येथील जैन मल्टिस्पेशॅलिटी रुग्णालयाचे सल्लागार डॉक्टर आणि संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. विक्रांत शाह यांनी दिली. मंकीपॉक्सची लागण झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर माणसांना त्या विषाणूची बाधा होते. त्यामुळेच हा विषाणू वेगानं पसरतो. विषाणूच्या फैलावाचा वेग ३.३ ते ३० टक्के इतका आहे. कांगोमध्ये या विषाणूच्या संक्रमणाचा दर ७३ टक्के होता.
मंकीपॉक्स एचआयव्हीप्रमाणे जेनेटिक असल्याचं एड्स सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. ईश्वर गिलाडा यांनी सांगितलं. मंकीपॉक्स प्राण्यांमधून माणसांपर्यंत पोहोचतो. मात्र तो महामारीचं रुप घेईल, याबद्दलची माहिती, आकडेवारी, वैद्यकीय तपशील अद्याप तरी समोर आलेले नाहीत. या विषाणूला घाबरण्याची गरज नाही. मात्र यावर संशोधन गरजेचं असल्याचं गिलाडा म्हणाले.
मंकीपॉक्सवर उपचार काय?
मंकीपॉक्सची लागण झालेल्यांना कांजण्यांवरील लस दिली जाते. ही लस आतापर्यंत प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. यासोबतच शास्त्रज्ञ अँटीव्हायरल औषध तयार करण्याचं काम करत आहेत. मंकीपॉक्सचा धोका अधिक असलेल्यांना कांजण्यांवरील लस देण्यात यावी, अशी शिफारस युरोपियन सेंटर फॉर डिजीज प्रिव्हेंशन अँड कंट्रोलनं केली आहे.