दरडी कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वेने मोठे पाऊल उचलले आहे. खास करून पावसाळ्यात रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळण्याची अधिक शक्यता असते. यामुळे मध्य रेल्वे मोठी तयारी केली आहे.
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई विभागातील कसारा आणि लोणावळा-खंडाळा घाटात १४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. दरडी कोसळून होणारे रेल्वे अपघात टाळण्यासाठी या सीसीटीव्हीच्या माध्यमातून रेल्वे सुरक्षा दलाकडून अहोरात्र पाहणी करण्यात येणार आहे. येत्या पंधरवड्यात हे सर्व सीसीटीव्ही कार्यान्वित होणार आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी नुकतीच घाटमार्गाची पाहणी केली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व उपाययोजना पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. दक्षिण-पूर्व म्हणजे कर्जत-लोणावळा विभागातील १९ असुरक्षित ठिकाणी ८७ कॅमेरे, तर ईशान्येकडील म्हणजे कसारा-इगतपुरी विभागात ११ संवेदनशील ठिकाणी ५८ असे एकूण १४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यापैकी ८७ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू झाले आहेत. उर्वरित कॅमेरे येत्या पंधरा दिवसांत कार्यान्वित करण्यात येणार आहेत. याशिवाय घाट विभागात ५९४ दगडांची तपासणी करण्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.