प्राथमिक माहितीनुसार, मुंबईत सध्या अधुनमधून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे ओव्हरहेड वायर्सवर शॉर्टसर्किट झाला. परिणामी हार्बर रेल्वेमार्गावरील वीजपुरवठा काहीवेळासाठी खंडित झाला होता. त्यामुळे अनेक ट्रेन्स ट्रॅकवर जागच्या जागी थांबून राहिल्या. आता हा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र, दरम्यानच्या वेळेत हार्बर रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. परिणामी लोकल ट्रेन १५ मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत. ही वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही कालावधी जावा लागेल. मान्सूनपूर्व पावसाच्या नुसत्या सरी बरसल्यानंतर ही अवस्था होत असेल तर पाऊस सुरु झाल्यावर काय होणार, असा प्रश्न अनेक प्रवासी उपस्थित करत आहेत.
मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी
मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. दादर, परळ, सायन, माटुंगा, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी या परिसरात सध्या अधुनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. काल रात्रीही काही ठिकाणी पाऊस झाला. त्यानंतर आज सकाळी काही पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. त्यामुळे उकाड्यातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, या आनंदावर रेल्वे वाहतुकीच्या खोळंब्याने विरजण टाकले आहे. पावसाळ्यात अनेकदा मुंबईतील रेल्वे वाहतूक ठप्प होते. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच त्याची चुणूक दिसून आली.