कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेबाबत निर्माण झालेला पेच अद्यापही कायम आहे. कोणत्याही पक्षाकडे ही जागा निवडून आणण्यासाठी आवश्यक असलेली पुरेशी मते नाहीत. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी मी अपक्ष उमेदवार म्हणून ही जागा लढवणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर शिवसेनेनंही या जागेसाठी उमेदवार देण्याचे प्रयत्न सुरू केल्याने संभाजीराजे कात्रीत सापडले आहेत. शिवसेनेकडून या जागेच्या उमेदवारीसाठी अनेक नावांची चर्चा आहे. मात्र सध्या शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांचं नाव राज्यसभा उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘राज्यसभेच्या उमेदवारीसाठी माझं नाव चर्चेत असल्याचं मला प्रसारमाध्यमांतून कळालं आहे. मात्र याबाबत मला मातोश्रीकडून अद्याप कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर मी नक्कीच ही निवडणूक लढवेन,’ असं संजय पवार यांनी म्हटलं आहे. मात्र आपण नेहमीच छत्रपती घराण्याचा आदर करतो, असंही ते म्हणाले.

संभाजीराजे आणि उद्धव ठाकरेंमध्ये नेमकं काय ‘ठरलंय’? कसा निघू शकतो मधला मार्ग?, वाचा…

‘या निवडणुकीत छत्रपती संभाजीराजे यांना छह देण्याचा प्रश्नच नाही. आम्ही छत्रपती घराण्याचा प्रचंड आदर करतो. त्या घरातील सर्वांच्या अगदी चिरजीवांच्याही आम्ही पाया पडतो, हे आमच्यावर संस्कार आहेत,’ असं संजय पवार म्हणाले.

दरम्यान, गेले ३३ वर्षे कट्टर शिवसैनिक असणाऱ्या संजय पवारांचे नाव थेट राज्यसभेचा उमेदवार म्हणून चर्चेत आलं आहे. शिवसेनेने अनेकदा सामान्य कार्यकर्त्याला संधी देत धक्कातंत्राचे राजकारण केलं आहे. यामध्ये आता संजय पवारांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात याबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here