राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरातील जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नाव निश्चित केल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून पुढे येत आहे. याविषयी अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, सहाव्या जागेवर शिवसेनेने उमेदवार जाहीर केल्यास संभाजीराजे छत्रपती यांचे सर्व पर्याय संपल्यात जमा असतील. त्यानंतर संभाजीराजे हे अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले तरी त्यांची निवडून येण्याची शक्यता फारच कमी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता संभाजीराजे मुंबईत आल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे किंवा अन्य कोणत्या नेत्याला भेटणार का? त्यानंतर राज्यसभेच्या सहाव्या जागेचा उमेदवारीचा तिढा सुटणार का, हे पाहावे लागेल.
संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पाठिंबा हवा असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी अट उद्धव ठाकरे यांनी घातली आहे. त्यासाठी संभाजीराजे यांना सोमवारी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर शिवबंधन बांधण्यासाठी या, असेही सांगण्यात आले होते. मात्र, संभाजीराजे छत्रपती हा प्रस्ताव नाकारून मुंबईतून कोल्हापूरला निघून आले होते. त्यामुळे संभाजीराजे यांच्या राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
मुंबईला निघण्यापूर्वी संभाजीराजेंचं सूचक वक्तव्य
संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी सकाळी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संभाजीराजे मोजकेच पण सूचक बोलले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. आमच्यात बोलणं झालं आहे. पुढे काय करायचंय तेदेखील ठरले आहे. उद्धव ठाकरे त्याप्रमाणेच वागतील, असा मला विश्वास आहे. मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील, असे संभाजीराजे यांनी सांगितले होते.